Lonavala News : खंडाळा घाटातील दरीत पडलेल्या युवकाला वाचविण्यात अपघातग्रस्तांच्या टिमला यश

एमपीसी न्यूज : खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिरा जवळून कारसह दरीत पडलेल्या युवकाला वाचविण्यात खोपोलीमधील अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेच्या युवकाना यश आले आहे. 

सागर सुरेश वावळे (वय 25, रा. लोणावळा) असे या युवकाचे नाव आहे. सागर हा फुटबाॅल खेळाडू आहे. फुटबाॅलचा नाईट सराव करण्यासाठी तो खोपोलीला जात असतो. गुरुवारी (2 सप्टेंबर) रोजी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे त्याच्या झेन कार मधून जात असताना अचानक त्याच्या गाडीला मागून धडक बसल्यासारखे त्याला वाटले व काही कळायच्या आतच त्याची गाडी उलटी पलटी होत दरीत कोसळली.

गाडीसह तो देखील दरीत कोसळला. या घटनेची माहिती समजताच खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. रात्रीचा अंधार, पावसाच्या सरी व निसरडा झालेला कडा असे संकट समोर असताना देखील अपघातग्रस्तांच्या टिमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांनी दरीत उतरण्याचा निर्णय घेतला, काळोखात आवाजावर त्यांनी सागरचा शोध घेतला, धिर दिला व मजल दरमजल करत त्याला दरीतून बाहेर काढले. जखमी सागरवर खोपोलीत उपचार करण्यात आले.

यावेळी टिम मधील दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, निलेश कुदळे, अमोल कदम, भक्ती साठेलकर, अबु जळगावकर, विजय भोसले, हनिफ कर्जीकर, अरुण म्हापणकर, उदय कोळंबे, बोरघाटचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश परदेशी, देवदूत यंत्रणा यांनी देखील रेस्क्यू साठी महत्वाची भूमिका पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.