Pimpri : आवास योजनेतील भ्रष्टाचार झाकण्यासाठीच छोट्या कामाच्या निविदा केल्या रद्द  – दत्ता साने 

महापालिका आयुक्त भ्रष्टाचार करण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा आरोप 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनांसह विविध मोठ्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा मोठा भ्रष्टाचार झाकण्यासाठीच आयुक्तांनी दहा लाखाच्या आतील कामाच्या 360 निविदा रद्द केल्या आहेत असा आरोप करत या ठेकेदारांनी ‘रिंग’ केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचारात नागपूरवरुन आयात केलेले आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी आहेत. भ्रष्टाचार कसा करावा, रिंग कशी करायची, याचे प्रशिक्षण आयुक्त देत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तसेच पालिकेत चोरी होत असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे, असेही ते म्हणाले.

विविध विकास कामांच्या निविदेत झालेल्या ‘रिंग’मुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 360 निविदा रद्द केल्या आहेत. याबाबत बोलताना साने म्हणाले, बो-हाडेवाडीतील आवास योजनेत झालेला भ्रष्टाचार, त्यावरुन होणारी टीका व विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच दहा लाख खर्चाच्या निविदा आयुक्तांनी रद्द केल्या आहेत. या सर्व निविदांची चौकशी करावी. या सर्व ठेकेदारांनी ‘रिंग’ केल्याने, त्यांना काळ्या यादीत टाकावे.

चोरी कशी करावी, रिंग कशी करायची याचे प्रशिक्षण आयुक्त श्रावण हर्डीकर देत आहेत. पालिकेत होणा-या भ्रष्टाचाराचे आयुक्त हर्डीकर हेच मुख्य आहेत. त्यासाठीच त्यांना नागपूरवरुन आयात करण्यात आले आहे. तसेच निविदा रद्द करुन पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे एकप्रकारे आयुक्तांनी मान्यच केले आहे. आयुक्तांनी पाकिट मारांना पकडले असून दरोडेखोरांना पकडणे गरजेचे आहे, असेही साने म्हणाले.

पारदर्शक कारभाराचा नारा दिल्याने शहरवासियांनी भाजपला मते दिली मात्र; त्यांना पारदर्शक कारभाराचा विसर पडला आहे. निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे सत्ताधारी भाजपाचा पारदर्शकतेचा ढोंगीपणा उघड झाला आहे. दीड वर्षातच सत्ताधारी भाजप पक्षाचा आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार उजेडात आला आहे, असेही साने म्हणाले.

दरम्यान, या सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.