Pimpri : केंद्राच्या निकषानुसार आवास योजनेच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात – राजू मिसाळ 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या पिंपरी व आकुर्डी येथील गृहप्रकल्पांच्या नव्याने प्रसिद्ध केलेल्या निविदाही वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. या सर्व गृहप्रकल्पांची निविदा प्रक्रिया केंद्राच्या निकषानुसार प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी स्थायी समितीचे सदस्य राजू मिसाळ केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रावेतमधील प्रस्तावित प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीसाठी रखडला आहे. तर आकुर्डीच्या गृहप्रकल्पाची फेरनिविदा काढण्यात आली आहे. आकुर्डीच्या गृहप्रकल्पाची फेरनिविदा कोणत्या निकषांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, असा प्रश्‍न स्थायी सदस्य राजू मिसाळ यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली.

राजू मिसाळ म्हणाले, केंद्र सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. मात्र, या सर्वच गृहप्रकल्पांच्या निविदांमध्ये हे निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे दरांमधील तफावत आढळते. यावरून वाद निर्माण झाल्याने पुन्हा दराची तपासणी व अन्य बाबींमुळे हे प्रकल्प उभारणीपुर्वीच वादग्रस्त ठरत आहेत. त्यामुळे या सर्व गृहप्रकल्पांची निविदा प्रक्रिया केंद्र सरकारच्या निकषांनुसार राबविण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.