Pune News : अंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेले ‘ते’ दोघे परत आलेच नाही, पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज : एकमेकांचे नातेवाईक असलेले आदिल मेहबूब शेख (वय 18) आणि आवेश मुझफ्फर शेख (वय 13) हे दोन तरुण शनिवारी सकाळी आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरले. परंतु नंतर ते परत आलेच नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

दौंड शहरातील असणारे हे दोघेही शनिवारी सकाळच्या सुमारास भीमा नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच नदी शेजारी असणाऱ्या लोकांनी धाव घेतली. दोघांनाही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ही मुले खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना वाचविण्यात अपयश आले आणि दोघांचाही मृत्यू झाला.

दरम्यान दोन मुले बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी भीमा नदीच्या तीरावर मोठी गर्दी केली होती. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या मदतीने नदीमध्ये शोधमोहिम राबवली आणि तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. उमद्या वयात तरुणांचा मृत्यू झाल्याने दौंड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.