Dehugaon News : अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा तृतीय वर्धापन दिन आज (गुरुवारी) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांना व कर्मचारी बंधू-भगिनींना सदिच्छा देण्यात आल्या.

शिक्षणातून नवसंस्कृती, नवसमाज, नवचैतन्य व सुंदर माणूस घडविण्याचा संकल्प मनात ठेवून सुरू झालेली ही सृजनशील वाटचाल. आज विद्यालयातील आदर्श, बहुआयामी ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मुख्याध्यापिका, सर्व ज्ञानसंपन्न व सेवाभावी शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद व विद्यार्थी, पालक बंधू-भगिनी यांच्या सदिच्छा- सहकार्यातून एक नितांत सुंदर कार्य उभे राहत आहे. अभंगरुपी हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर आज अनेकांना ज्ञानामृत देत आहे, याचा मनापासून आनंद व समाधान प्रत्येक क्षणी वाटतो आहे. या प्रवासात आम्हांस सहकार्य करणाऱ्या, मनापासून सदिच्छा व आशीर्वादाचे पाठबळ देणाऱ्या आपल्या प्रत्येकाविषयी आम्ही सदैव कृतज्ञ आहोत. अशा भावना संस्थेच्यावतीने सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद व सचिव प्रा. विकास कंद यांनी व्यक्त केल्या.

मागील दोन वर्षात कोविडकाळामध्ये अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांची शाळेविषयीची आवड व अभ्यासाविषयीची गोडी कायम ठेवण्याचे कार्य शिक्षकांनी अतिशय प्रयत्नपूर्वक केले. शाळेच्या वतीने यावर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सृजनदीप’ वार्षिक अंकाच्या माध्यमातून मागील काळात केलेल्या सर्व कृतीकार्याचा सविस्तर वृत्तांत मांडण्यात आला आहे.

यावर्षी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रमांची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शाळेच्या क्रीडा विभागांतर्गत बास्केट बॉल, स्केटिंग, मल्लखांब, मुलींसाठी रोप मल्लखांब यांसारखे खेळ व या खेळांसाठी तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून असणार आहेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासून संगणकाचे ज्ञान मिळावे व अद्ययावत तंत्रज्ञानाने त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी सुसज्ज संगणक कक्ष तयार करण्यात आला आहे.

या संगणक कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यास संगणकाचे ज्ञान अतिशय सुलभपणे तज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयोगशील कृती कार्यक्रमाचे आयोजन यापुढील काळात करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.