Ind Vs Eng Test Series : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा मैदानावर आजपासून भारत – इंग्लंडचा तिसरा कसोटी सामना 

0

 एमपीसी न्यूज – भारत आणि इंग्लंड दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसरा सामना आजपासून (बुधवार, दि. 24) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंड तर, दुसरा भारताने जिंकला आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून, मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघ मोठा जोर लावणार हे निश्चित. 

गुलाबी चेंडूवर डे-नाईट हा सामना खेळवला जाणार आहे. फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी उत्तम साथ देईल, परंतु वेगवान गोलंदाजांचीही भूमिका महत्त्वाची राहील, असा दावा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. इशांत शर्मा कसोटी कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळत आहे. 100 वा कसोटी सामना खेळणारा इशांत भारताचा अकरावा खेळाडू आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये चारशे बळींचा टप्पा गाठण्यासाठी सहा बळींची गरज आहे. त्याने कसोटीत 394 बळी घेतले आहेत.

तिसऱ्या कसोटीसाठी मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळून तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यामुळे उमेश यादवचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे इशांत शर्मा आणि जसप्रित बुमराच्या साथीने तिसऱ्या स्थानासाठी उमेश, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंडय़ा असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चरच्या साथीला स्टुअर्ट ब्रॉड किंवा मार्क वूडला संधी मिळेल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रॉरी बर्न्‍सच्या जागी गुणी फलंदाज झॉक क्रॉवली संघात स्थान मिळवेल, तसेच तिसऱ्या क्रमांकावर डॅन लॉरेन्सऐवजी जॉनी बेअरस्टो खेळेल.

फलंदाजीत दोन्ही संघांचे पारडं जड आहे. मोठी पारी खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू संघात आहेत. भारताकडून विराट, रोहित, गिल, पुजारा आणि रहाणे यांच्या खेळांवर विशेष लक्ष राहील. संघाला एका पाठोपाठ होणा-या पडझडीला रोखण्याचे आव्हान खेळाडूंसमोर असेल. इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा दुसऱ्या कसोटीत फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्यामुळे या खेळपट्टीवरील त्याच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. याशिवाय बेअरस्टो, बेस, वोक्स यांची कामगिरी महत्त्वाची आहे.

असे असतील संघ 

भारत – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

इंग्लंड – 

जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्‍स, झॉक क्रॉवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.