Pune Crime News: राज्य महामार्गावर लूटमार करणाऱ्या ‘त्या’ चोरट्यांना अखेर बेड्या

0

 एमपीसी  न्यूज:  पुणे अहमदनगर या राज्य महामार्गावर प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या चोरट्यांना अखेर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शरद उर्फ सदानंद गंगाधर जवक (वय 29) आणि श्रीकांत दत्तात्रय सरोदे, (वय 22) अशी या चोरट्यांची नावे आहेत. दिवाळीची सुट्टी संपवून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांना मारहाण करून या चोरट्यांनी लुबाडले होते.

 श्रीगोंदा तालुक्यातील अमित खराडे हे 15 नोव्हेंबर रोजी दिवाळीची सुट्टी संपून पुण्याच्या दिशेने निघाले होते. रांजणगाव गणपती जवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांना अडवून मारहाण करत त्यांची दुचाकी आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांनी तांत्रिक बाबी तपासल्या असता वरील आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव मशीद या गावातून वरील दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. पुढील तपासासाठी त्यांना रांजणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III