Chinchwad : आयुक्तालयातील ‘त्या’ तीन टीमचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन टीमचा ‘बेस्ट डिटेक्शन’ केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सत्कार केला. पोलीस अधिका-यांचे मनोबल वाढविण्यसाठी पोलीस आयुक्तांनी सुरुवात केली आहे. चांगल्या कामगिरी करणा-यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच कामगिरी करण्यासाठी कमी पडणा-या पथकांना सूचना देखील दिल्या जात आहेत. गुरुवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत हा सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे परिसरात खुनाचा गुन्हा घडला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने 24 तासात करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, दत्तात्रय बनसुडे, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, मयूर वाडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ठ प्रयत्न म्हणून या पथकाचा गौरव करण्यात आला.

14 ऑक्टोबर 2019 रोजी पिंपरी-चिंचवड परिसरातून फॉर्च्युनर कार चोरीला गेली. या कारचा तपास पोलीस ठाण्यासोबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुरु केला. तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना कारची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत हे पथक थेट राजस्थान येथे पोहोचले. सलाम आठ दिवस राजस्थान येथे राहून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एक कोटी 33 लाख रुपये किमतीच्या 12 महागड्या कार जप्त केल्या. सर्वोत्कृष्ठ मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, प्रमोद लांडे, अमित गायकवाड, अंजनराव सोंडगीर, मनोजकुमार कमले, महेंद्र तातळे, विजय मोरे, विशाल भोईर या पथकाचा सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे परिसरात एका ज्वेलर्स दुकानावर 30 सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. ज्वेलर्सच्या दुकानातून चोरट्यांनी सुमारे 22 लाख रुपयांचा ऐवज पळवला. भर बाजारपेठेत हा गुन्हा घडल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान तळेगाव दाभाडे पोलिसांसमोर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस कर्मचारी बंडू मारणे, सीताराम पुणेकर, मनोज गुरव, अमोल गोरे, महेंद्र रावते यांच्या पथकाने 48 तासात हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी गुन्हा केल्यानंतर आसाम येते पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिताफीने त्यांना अटक करून त्यांच्याकडून 22 लाख 500 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. सर्वोत्कृष्ठ प्रयत्न केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी या पथकाचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.