Maval News : पर्यटकांच्या गर्दीने मावळची पर्यटनस्थळे गजबजली

एमपीसीन्यूज – नाताळ आणि सलग आलेल्या सुट्या तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने मावळ तालुक्यातील गड-किल्ले, धार्मिकस्थळे आणि पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहेत. तर व्यावसायिक या सर्वांचे आनंदाने स्वागत करीत आहे.

शुक्रवारची नाताळची सुट्टी आणि शनिवार-रविवारची शासकीय सुट्टी जोडून आल्याने अनेकांनी सहपरिवार आणि मित्रपरिवारासह पर्यटनस्थळी हजेरी लावली. तर काहीजण स्वतःच्या वाहनासह घराबाहेर पडल्याने सर्वत्र वर्दळ वाढली.

पुणे-मुंबई महामार्ग, पुणे – मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच तळेगाव – चाकण महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

नाताळच्या पूर्वसंध्येपासून मावळात पर्यटक पर्यटनासाठी दाखल झालेले होते. लोणावळा, खंडाळा, पवनानगर, लोहगड, विसापूर, तुंग या गडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तर बेडशे, कार्ला, भाजे या लेण्याच्या परिसरात पुण्या-मुंबईचे बरेच पर्यटक दाखल झाले होते.

आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, येथेही पर्यटकांची गर्दी झाली होती. तर घोरवडेश्वर. प्रतिशिर्डी, शिरगाव, प्रतिपंढरपूर, दुधिवरे, भंडाराडोंगर या धार्मिक स्थळी भाविकांनी तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.

पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. तर महामार्गावर हॉटेल, ढाबे, गर्दीने भरून गेले होते. याशिवाय खाद्यपदार्थांची दुकानेही सजली होती. पुणे-मुंबई वरून येणारे बहुतेक पर्यटक,भाविक हे चारचाकी वाहनातून आल्याने पार्किंगचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

नाताळच्या सुट्ट्या आणि थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मावळात गर्दी होण्याची शक्यता असून यानिमित्त पुणे-मुंबईच्या पर्यटकांची एक दिवशीय सहल साजरी होते. सध्या रेल्वे बंद असल्याने बहुतेक पर्यटक हे चारचाकी गाडीतून येताना दिसत आहे.

गावातील बहुतेक हॉटेल, रिसॉर्ट आणि धरण परिसरातील ॲग्रीटुरिझम केंद्र पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केल्याने हाऊसफुल झालेले आहेत. हजारोंच्या संख्येने पर्यटक आले असल्याने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आलेला असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.

मावळातील शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला या गर्दीचा कळत-नकळत त्रास होत आहे. सर्वाधिक गर्दी लोणावळा-खंडाळा, कार्ला, भाजे, पवनानगर परिसर, लोहगड, विसापूर, तुंग हे गडकिल्ले तर घोरवडेश्वर, शिरगाव, शिर्डी, प्रतिपंढरपुर, दुधिवरे येथे झालेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.