Pune : जीएसटी बुडविल्याप्रकरणी पुण्यातील व्यापाऱ्यास मुंबईतून अटक

एमपीसी न्यूज – तब्बल 79 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाऱ्यास मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आलेलेली पुण्यातील ही पहिलीच कारवाई आहे. जीएसटीच्या पुणे झोनल युनिटकडून ही कारवाई केली आहे. पुण्यातील व्यापारी मोदसिंग पद्मसिंह सोढा यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. 79 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी सोढा यांना मुंबईतून 26 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी न्यायालयाने सोढा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोढा याने 10 बनावट कंपन्या स्थापन केल्या असून त्याद्वारे 415 कोटी रुपयांचे केवळ कागदी व्यवहार केले आहे. या प्रकरणात एकूण 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. वस्तू न पुरवता देण्यात आलेल्या पावत्यांच्या आधारे हा घोळ करण्यात आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार करून त्याद्वारे काळा पैसा निर्माण करण्यात येत असल्याची शक्यता युनिटने व्यक्त केली आहे.

युनिटला मिळाल्या माहितीनुसार, चौकशी केली असता काही व्यक्ती जीएसटी नोंदणी करून त्याआधारे बनावट बिलांद्वारे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषित केल्यानंतर या रॅकेटमधील काही प्रमुख व्यक्तींची नावे मिळाली होती. त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी सोढा यांना अटक करण्यात आली आहे. युनिटने केलेल्या पहिल्याच तपासणीमध्ये या बनावट कंपन्यांकडून २ कोटी १८ लाख रुपयांचा जीएसटी जमा करण्यात आला आहे. अशा कंपन्यांच्या माध्यमांतून सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असून अनेक कंपन्यात त्यात सहभागी आहेत. अशी कामे करण्यारे एक मोठे रॅकेट सक्रिय असून त्याची व्याप्ती देशभर पसरली आहे, अशी माहिती युनिटकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.