Chinchwad : वाहतूक शाखेच्या विशेष मोहिमेत तीन दिवसात सव्वातीन लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेत 788 वाहन चालकांकडून तीन लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 12 वाहन चालकांचे लायसन्स जमा करण्यात आले आहेत.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहन चालक वाहने चालवतात. नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे, वाहन चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणे, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, भरधाव वेगात वाहन चालवणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणे या कारणांमुळे अनेक अपघात होतात. या नियमभंग करणा-या वाहन चालकांवर वचक बसविण्यासाठी वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

नियमांचे पालन न करणा-या वाहनांवर दंडाची कारवाई केली जाते. अनेकदा हे दंड सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून ऑनलाईन बनवले जातात. ऑनलाईन आलेले दंड भरण्यासाठी वाहन धारक उदासीनता दाखवतात. त्यामुळे ही दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. यामध्ये एक हजार 974वाहने तपासली. त्यातील 799 वाहनांवर दंड असल्याचे निदर्शनास आले.

वाहतूक पोलिसांनी 788 वाहन चालकांकडून तीन लाख 36 हजार रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे. तर दंड न भरणा-या 13 जणांचे लायसन्स जमा करून घेतले आहेत. दंडाची रक्कम भरल्यानंतर त्यांना लायसन्स परत दिले जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.