Wakad : पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल हिसकावणारे तिघेजण पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात पोलिसांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. पोलीस आता टीम नुसार काम करत आहेत. या टीमचा फायदा बुधवारी पोलिसांना झाला. मोबाईलवर बोलत जाणा-या पादचा-याचा मोबाईल फोन हिसकावणारे तिघेजण पोलिसांच्या जाळ्यात फसले आहेत.

शुभम नितीन काळभोर (वय 18, रा. मोरेवस्ती, भीमशक्ती नगर, झोपडपट्टी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अन्य दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी महेश नारायणदास सोमाणी (वय 22, रा. लोकमान्य कॉलनी, थेरगाव. मूळ रा. जिंतूर, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी महेश हे सायंकाळी आठच्या सुमारास थेरगाव मधील गणेश मंदिराजवळ फोनवर बोलत पायी जात होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन हिसकावला. त्यानंतर फिर्यादी आणि आसपासच्या लोकांनी चोर-चोर असा मोठ्याने आरडा-ओरडा केला. दरम्यान दुचाकीवरील तिघेजण डांगे चौकाजवळ पोहोचले. त्यावेळी डांगे चौकामध्ये वाकड पोलीस ठाण्यातील टीम क्रमांक तीन, नऊ आणि अकरा कार्यरत होत्या. चोर-चोर असा आवाज ऐकताच त्या टीम मधील पोलीस हवालदार रोहिदास टिळेकर, पोलीस शिपाई मयूर जाधव, दत्तप्रसाद चौधरी, शरद दुधाळ यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेत पाठलाग करून दुचाकीवरील तिघांना पकडले.

तिघांकडून 13 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपी शुभम याच्यावर पिंपरी, निगडी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार रोहिदास टिळेकर, पोलीस शिपाई मयूर जाधव, दत्तप्रसाद चौधरी, शरद दुधाळ यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.