Chakan News : विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकची पीएमपी बससह चार वाहनांना धडक 

बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने आलेल्या एका ट्रकने पीएमपी बस आणि अन्य तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये बस, तीन वाहने आणि ट्रक यांचे नुकसान झाले. तर बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 4) सायंकाळी शिक्रापूर – चाकण रोडवर बहुळ गावाजवळ घडला.

साळबा संभाजी मुंडे (रा. दिघी) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. याबाबत पीएमपी बसचालक प्रभाकर गोविंदराव बनसोडे (वय 43, रा. भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश ज्ञानदेव धायगुडे (रा. पाडळी, ता. खंडाळा, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बस चालक आहेत. ते शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शिक्रापूर – चाकण रोडने पीएमपी बस घेऊन जात होते. बहुळ गावच्या हद्दीत आल्यानंतर आरोपी ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने ट्रक चालवून फिर्यादी यांच्या पीएमपी बसला आणि आणखी तीन चारचाकी वाहनांना धडक दिली.

यामध्ये पाचही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर फिर्यादी यांच्या बसमधील प्रवासी साळबा मुंडे यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.