Dehuroad : पोलीस स्टेशनला चल म्हणून अंधा-या जागेत नेऊन ट्रक चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – ट्रक अडवून रिक्षाचे नुकसान झाले असल्याचे म्हणत पोलीस स्टेशनला नेण्याच्या बहाण्याने अंधारात नेऊन चार जणांनी मिळून ट्रक चालकाला लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 5) रात्री आठ वाजता शिंदे पेट्रोल पंपाजवळ, किवळे पूल येथे घडली.

अनिल गुलाबराव खामकर (वय 38, रा. न-हेगाव, ता. हवेली) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 5) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक चालक आहेत. ते गुरुवारी रात्री त्यांच्या ट्रकमध्ये नायट्रोजन लिक्विड घेऊन फलटणकडे जात होते. किवळे पुलाजवळ चार अनोळखी चोरट्यांनी खामकर यांचा ट्रक अडवला. खामकर यांना खाली बोलावून ‘तू दुचाकीला दाबल्याने तो आमच्या गाडीवर आदळला. त्यामुळे रिक्षाचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई दे’ असे म्हटले. त्यानंतर रिक्षात बसवून पोलीस स्टेशनला नेण्याच्या बहाण्याने खामकर यांना अंधा-या जागेत घेऊन गेले. तिथे खामकर यांच्या खिशातून जबरदस्तीने 15 हजार रुपये काढून घेतले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.