Pimpri : ‘त्या’ दोन उपअभियंत्यांचे सेवानिलंबन रद्द 

एमपीसी न्यूज – आपत्ती व्यवस्थापन आढाव्यासाठी बोलविलेल्या महत्वाच्या बैठकीस कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या दोन उपअभियंत्यावर चार महिन्यांपूर्वी करण्यात आलेली सेवानिलंबनाची कारवाई अचानक रद्द करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

किशोर सोपाना महाजन आणि विजयकुमार चंद्रभान काळे असे सेवानिलंबित रद्द केलेल्या उपअभियंत्यांचे नाव आहे. महाजन आणि काळे हे महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि जलनि:सारण विभागामध्ये ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्थापत्य विभागात कार्यरत आहेत. शहरात 21 जून 2018 रोजी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 22 जून रोजी त्यांच्या दालनात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक बोलविली होती.

या महत्वाच्या बैठकीस उपअभियंते महाजन आणि काळे हे उपस्थित राहिले नाहीत. दोघांच्याही विनापरवाना गैरहजेरीमुळे आपत्ती व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा व जलनि:सारण अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला. या परिस्थितीस महाजन आणि काळे हेच जबाबदार असल्याचा अहवाल ग क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिका-यांनी 22 जून रोजी सादर केला.

त्यानुसार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ महाजन आणि काळे यांना सेवानिलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीनेही आपल्या अहवालात आपत्कालीन परिस्थितीत महाजन व काळे यांनी पर्यवेक्षकीय नियंत्रण न ठेवल्याने आणि परिस्थिती उद्भवण्यापूर्वी योग्य उपाययोजना न केल्याने आपत्कालीन आरोग्य विघातक परिस्थिती उद्भवल्याचे निदर्शनास आणून दिले. असे असतानाही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महाजन आणि काळे यांचे सेवानिलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही उपअभियांत्यांनी तात्काळ पूर्ववत स्थानी रूजू व्हावे. तथापि, शास्ती कारवाईबाबत त्यांना 6 आक्टोबर 2018 रोजी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीवर नंतर निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.