Ravet News : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोघांना अटक

दोन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – रावेत परिसरात खंडणी विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. 1) करण्यात आली.

खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बालाजी उर्फ रामा नारायण उपगंडले (वय 33, रा. थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपी भोंडवेवस्ती, रावेत येथे पिस्तूल घेऊन आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून बालाजी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा 40 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला.

गुंडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये निलेश विजय गायकवाड (वय 25, रा. रामनगर झोपडपट्टी, वारजे, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी निलेश हा जाधववस्ती, रावेत येथील डी मार्टच्या मागे पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. निलेश कडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा 51 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. वरील दोन्ही प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.