Bopkhel News : चायनीज उधार न दिल्याने दोघांना मारहाण

दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चायनीज पदार्थ उधार न दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून चायनीज सेंटर चालकाला आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर कोयता दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. दुस-या दिवशी पुन्हा येऊन कोयत्याने तोडफोड करत एका ऑफिसचे शटर फाडले. ही घटना गणेश नगर, बोपखेल येथे घडली.

सोमनाथ तोंडिलकर, पपी उर्फ मनोज शिर्के (दोघे रा. बोपखेल गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत आकाश अभिमन्यू वाघमारे (वय 32, रा. रामनगर बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपखेल मधील गणेशनगर येथे फिर्यादी आकाश यांचे विशाखा चायनीज सेंटर नावाचे चायनीज पदार्थांचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता आरोपी चायनीज सेंटरवर आले. त्यांनी चायनीज खाद्यपदार्थ उधार मागितले. मात्र आकाश यांनी ते देण्यासाठी नकार दिला. त्या कारणावरून आरोपींनी आकाश आणि त्यांचा मित्र विकास नारायण उजगरे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर कंबरेला लावलेला कोयता काढून जीवे मारण्याची धमकी दिली.

गुरुवारी रात्री सव्वाएक वाजता आरोपी पुन्हा आकाश यांच्या चायनीज सेंटर समोर आले. त्यांनी कोयत्याने तोडफोड केली. महेंद्र वाघमारे यांच्या ऑफिसच्या शटरवर कोयत्याने मारून शटर फाडून एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.