Chakan News : वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

एमपीसी न्यूज – कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत होते.

रोहित बाबू साळवी (वय 20, रा. रेल्वे स्टेशन समोर, कल्याण, ठाणे), हर्षदीप भारत कांबळे (वय 22, रा. नादिवली इस्ट कल्याण, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई रवींद्र नामदेव करवंदे (वय 30) असे मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस शिपाई करवंदे चाकण चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी कंटेनर मागे घेण्याच्या कारणावरून करवंदे आणि आरोपी यांच्यात वाद झाला. त्यावरून आरोपींनी करवंदे यांना लोखंडी रॉडने मारून जखमी केले.

मारहाण केल्यानंतर आरोपी कल्याण येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेला याबाबत सूचना देऊन आरोपींचा मग काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.