Talegaon Crime News : ‘नो बॉल’ दिला म्हणून अंपायरला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – क्रिकेट खेळताना अंपायर असलेल्या मुलाने नो बॉल दिला. या कारणावरून बॉलरने मुलाला दगडाने मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी अंपायर मुलाची आई आरोपीकडे गेली असता बॉल टाकणारा आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांनी अंपायर मुलगा आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी दोन वाजताच्या सुमारास डाळ आळी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

जखमी अंपायर मुलगा अल्पवयीन असून त्याच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी फिर्यादी यांचा जखमी मुलगा निशांत आणि आरोपी डाळ आळी येथील गणपती मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत होते. निशांत हा अंपायर होता. तर आरोपी श्रवण हा बॉल टाकत होता.

श्रवण याने टाकलेला बॉल हा निशांत याने नो बॉल दिला. त्यावरून श्रवण याने निशांतला शिवीगाळ करत दगड मारला. दगड नडगीवर लागल्याने निशांत लंगडत घरी गेला. निशांतकडे विचारपूस करून त्याची आई फिर्यादी अश्विनी या आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि निशांत या दोघांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.