Chinchwad : गहूंजे क्रिकेट बेटिंग प्रकरणात बेटिंगचा बेताज बादशाह कमल खान पोलिसांच्या जाळ्यात

The undisputed king of betting, Kamal Khan, has been caught by the police in the Gahunje cricket betting case.

एमपीसी न्यूज – गहूंजे स्टेडीयमवर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर निगराणी ठेऊन बेटिंग घेणाऱ्या एका टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले. त्या प्रकरणाचे धागेदोरे स्थानिक पासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले असून पोलिसही त्याचा मग काढत आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत. त्यात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी बेटिंगच्या दुनियेतील बेताज बादशाह म्हणून ओळख असलेल्या कमल खानला नागपूर येथून अटक केली आहे. यामुळे बेटिंग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गहुंजे येथे 26 मार्च रोजी झालेल्या भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेणा-या टोळीला तीन ठिकाणाहून पोलिसांनी पकडले. अटक केलेले आरोपी विविध राज्यातील असून त्यांचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींशी असण्याची शक्यता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वर्तवली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासही सुरु केला. 1 एप्रिल पर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 37 जणांना अटक केली आहे. तसेच आणखी 25 आरोपी निष्पन्न झाले होते.

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस करीत आहेत. या पथकाने सोमवारी (दि. 26) नागपूर येथून कमल खान याला अटक केली. कमल खान याची बेटिंगच्या दुनियेतील बेताब बादशाह अशी ओळख आहे. त्याचे भारतभर नेटवर्क आहे. त्या माध्यमातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले असून पिंपरी चिंचवड पोलीस कमल खानकडे तपास करीत आहेत. त्यातून आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

गहुंजे क्रिकेट बेटिंग प्रकरण

26 मार्च रोजी भारत-इंग्लंड यांच्यात क्रिकेट सामना झाला. या क्रिकेट सामन्यावर भोपाळ येथील मुख्य बुकी भोलू आणि नागपूर येथील मुख्य बुकी चेतन उर्फ सोनुडावर यांच्यासाठी काही जणांनी पुण्यातील विविध भागातून ऑनलाईन माध्यमातून बेटिंग घेतली. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी मामुर्डी येथील एका बांधकाम साईटवर, घोरावडेश्वर डोंगरावर तसेच विमाननगर येथील एका हॉटेलवर कारवाई करून 33 जणांना अटक केली. पोलीस कारवाईसाठी गेले असता आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करून मुक्कामार देऊन दुखापत केली. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात 45 लाख 37 हजार 400 रुपयांचे 75 मोबाईल फोन, तीन लॅपटॉप, अत्याधुनिक कॅमेरे, दुर्बिणी, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.

कोरोना साथ सुरु असल्याने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामने प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात आले. मैदानात प्रेक्षक नसल्याने सर्व क्रिकेट प्रेमी टीव्ही आणि ऑनलाईन माध्यमातून क्रिकेट सामने पाहत होते. प्रत्यक्ष क्रिकेट सामना आणि त्याचे प्रक्षेपण यामध्ये सुमारे सहा मिनिटांचे अंतर असते. या अंतराचा फायदा घेऊन आरोपी त्यांच्या वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे बेटिंग घेत होते.

बेटिंग अ‍ॅप्लिकेशन तयार करणारे आणि त्यावर बेटिंग घेणारे यांचा एक गट असतो. तर प्रत्यक्षात सर्वसामान्य क्रीडाप्रेमी पैसे लावतात त्यांचा एक गट असतो. बेटिंग घेणा-या लोकांची एक टीम क्रिकेटच्या प्रत्यक्ष सामन्यावर लक्ष ठेऊन असते. तिथे घडणा-या घडामोडीनुसार त्यांच्या अ‍ॅप्लिकेशन मधील सर्व व्यवहार बदलतात आणि बेटिंग घेणा-या गटाला मोठा आर्थिक फायदा होतो. तर सर्वसामान्य नागरिक पैसे हरतात.

भारतात बेटिंग अ‍ॅप्लिकेशन बेकायदेशीर आहे. असे असताना हे आरोपी गहुंजे येथील स्टेडियमच्या बाजूला असलेल्या एका उंच इमारतीमध्ये आणि डोंगरावर बसले. तिथून ही मंडळी अत्याधुनिक कॅमे-यातून क्रिकेट सामना पाहून त्याद्वारे त्यांच्या बेटिंग अ‍ॅपमधील आर्थिक गणिते फिरवत होते. आरोपींचा एक गट गहुंजे स्टेडियमच्या बाजूला असलेल्या एका उंच इमारतीत, एक गट घोरावडेश्वर डोंगरावर थांबून सामन्यावर लक्ष ठेऊन होता. तर एक गट पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून यावर नियंत्रण ठेवत होता.

या प्रकरणात एकूण 13 अ‍ॅप्लिकेशन वापरले गेले असून त्यातील एका अ‍ॅपच्या मालक व डेव्हलपरला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुंबई आणि नागपूर येथील दोन मुख्य बुकींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे नागपूर, मुंबई, दिल्ली, हरियाणा, जयपूर, गोवा या शहरातील बुकिंपर्यंत पोहोचले आहेत. देशभरातील अन्य महत्वाच्या शहरातील बुकींची देखील नावे तपासात समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींशी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.