Pune : आतुरता बाप्पांच्या आगमनाची 

सजावटीच्या साहित्याने बहरली पुणे, पिंपरी-चिंचवडची बाजरपेठ

एमपीसी  न्यूज – बाप्पांच्या स्वागतासाठी प्रत्येकजण आता तयारीला लागला आहे. आपला गणराया इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसावा यासाठी सजावट करण्यात येते. या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठ सजली आहे.

लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोट्या-छोट्या दिव्यांच्या माळा, प्लास्टिकची फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा व फुले, फुलांचे विविध प्रकार एक ना अनेक नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत. सध्या गणेशोत्सवाचा रंग बहरत असताना वैविध्यपूर्ण व नावीन्यपूर्ण साहित्य बाजारात आले आहे.

विविध प्रकारचे हार, मोत्यांचे हार, मुकुट, रंगीत खडे आणि क्रिस्टल्सने बनविलेले आकर्षक दागिने बाजारात विक्रीसाठी आले आहेत. निसर्गप्रेमींसाठी खास इको फ्रेंण्डली मखर, सिंहासने बाजारात दाखल झाली आहेत. कापडी पिशव्यांची मखरे, लाकडी सिंहासने, नक्षीदार आरास यामुळे पर्यावरणपूरक सजावटीसाठी या वस्तूंना मोठी मागणी होत आहे. मखर 400 ते 3000 रुपये, हार 60 ते 250 रुपये, छोटी कलात्मक झाडे 25 ते 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरोघरी गणेश आगमनाची तयारी तर सुरूच आहे, पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल याबाबत अनेक तरुण मंडळांमधूनही मंडप उभारणी तसेच सजावटीसाठीची तयारी सुरू झाली आहे.

 

गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी पूर्वी वेली, झाडांची पाने यांचा वापर करण्यात येत होता. परंतु आता बदलत्या ट्रेंडनुसार गणेशभक्तांची सजावटीच्या साहित्याची मागणी बदलली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आकर्षक साहित्य बाजारात दाखल झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग दिसत आहे. शहरात गणेशोत्सव मंडळाच्या मंडप बांधणीस वेग आला आहे. आकर्षक मंदिरे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. लाडक्या बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, प्लास्टिकची फुले, क्रिस्टल माळा, फुलांचे विविध  प्रकार एक ना एक अनेक नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत.

 

बाजारपेठ आकर्षक गणेशमूर्ती व आरास सजावटीचे साहित्याने सजली आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे नऊ दिवस राहिले आहेत.  शहरातील मूर्ती स्टॉलवर मूर्ती बुकिंगसाठी गर्दी दिसत आहे.  सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मंडप बांधणी, देखावा बनविण्यात गुंतले असल्याचे दिसून येत असून शहरात चौका-चौकात मोठ-मोठे मंडप उभे राहत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.