Bhosari Crime News : तरुणांच्या दक्षतेमुळे मनोरुग्ण महिलेवरील अतिप्रसंग टळला

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या पार्श्र्वभूमीवर गस्तीवर असलेल्या तरुणांच्या दक्षतेमुळे सुनसान रस्त्याकडेला झोपलेल्या मनोरुग्ण महिलेवरील अतिप्रसंग टळला. भोसरीतील मॅगझिन चौकाच्या जवळ आज (सोमवारी, दि.14) पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पोलीस वेलफेअर असोसिएशनचे अरुण जवळगे यांनी याबाबत सांगितलेली हकीकत अशी, कार्तिक एकादशीच्या पार्श्र्वभूमीवर आळंदी आणि आसपासच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानिमित्ताने बंदोबस्तासाठी पोलीस वेलफेअरचे आठ ते दहा सहकारी आणि तीन पोलीस कर्मचारी भोसरीतील मॅगझिन चौकाच्या जवळील टेन्ट मध्ये थांबले होते. त्यावेळी रस्त्यापलिकडे महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला. सर्व तरुण आवाजाच्या दिशेने धावत गेले.

अकरा ते बारा जण धावत आल्याचे पाहून महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने आलेला इसम त्याठिकाणाहुन पळून गेला. या तरुणांनी घाबरलेल्या महिलेला धीर देऊन तिला सुखरूप पोलीस टेन्ट मध्ये नेऊन झोपवले. हि महिला मनोरुग्ण आहे मात्र, तिला लिहिता वाचता येत असल्याची माहिती अरुण जवळगे यांनी दिली. तरुणांच्या दक्षतेमुळे एक मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग होता होता टळला.

दरम्यान, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे म्हणाले, “या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात माहिती मिळालेली नाही. रविवारी रात्री महिला पोलीस अधिकारी गस्तीवर होत्या. प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई होईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.