Akurdi : परिस्थितीने भीक मागण्यास मजबूर झालेल्या नेपाळी तरुणाची मायदेशी वापसी

माणुसकीचं घडलं दर्शन, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला स्टेशन मास्तरांनी निरोप

एमपीसी न्यूज – नेपाळमधून भारतात कामाच्या शोधात आलेल्या मात्र परिस्थितीमुळे भीक मागण्यासाठी मजबूर झालेल्या नेपाळी तरुणाची अखेर त्याच्या मायदेशी त्याच्या परिवाराजवळ वापसी झाली. स्टेशन मास्टरच्या प्रयत्नांमुळे एका अपंग झालेल्या तरुणाला त्याची माणसं मिळाली.

सिद्धराज डुंगाना (वय 32,लानकीचुहा नगरपालिका, ब्लॉक क्रमांक 6, पिंपरकोटी कलाटी) असे या तरुणाचे नाव आहे.

सिद्धराज हा नेपाळमधील लानकीचुहा येथील. घरची अतिशय बेताची परिस्थिती हाताला काम नाही. अशा परिस्थितीत त्याने घर सोडलं. भारतात रोजगार मिळवून घरी पैसे पाठवण्याचा विचार करून त्याने नेपाळ सोडलं. सुरुवातीला मथुरा व नंतर थेट पुणे गाठून कान्हेफाटा येथे सुरक्षारक्षकाचे काम मिळवले. त्यानंतर कामशेत एमआयडीसीमध्ये काम मिळाले. त्याचा उदरनिर्वाह सुरू झाला. मधल्या काळात घरच्यांशी संपर्क होता. मात्र तो खूप अल्पकालीन.

सर्व काही सुरळीत सुरू असताना एका रात्रीने त्याचा आयुष्य उध्वस्त केलं. जेवणासाठी जात असताना त्याचा अपघात झाला. एका ट्रकने त्याला जबर ठोस मारली. या अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला. या घटनेनंतर सिद्धराजचं संपूर्ण मानसिक संतूलन ढासळलं. अशा परिस्थितीत ना तो घरी जाऊ शकत होता. ना त्याला कुठे काम मिळत होतं. अखेर त्याच्याजवळ भीक मागण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. पुणे ते मुंबई वेगवगळ्या रेल्वे स्टेशनवर त्याने भीक मागायला सुरुवात केली.

गेल्या दोन वर्षांपासून तो आकुर्डी येथील रेल्वे स्टेशनवर भीक मागत आपली गुजराण करीत होता. या सर्व परिस्थितीमुळे अखेर तो आपल्या परिवारापासून पूर्णपणे दुरावला गेला. त्यातच या ठिकाणी त्याचं कोणी ओळखीचेही नव्हते. दुर्दैव इथेच थांबले नाही. त्याच्या या भीक मागण्यावरही काही लोक गुजराण करीत होते. ते त्याला दररोज सकाळी आकुर्डी रेल्वे स्थानकावर आणून सोडत तसेच सायंकाळी त्याच्या जवळील रक्कम घेऊन जायचा.

_MPC_DIR_MPU_II

हा सर्व प्रकार आकुर्डी स्थानकातील स्टेशन मास्तर रतन रजक यांच्या लक्षात आला. मात्र त्यांना नेपाळी भाषा अवगत नव्हती. तरीही ते त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत. प्रसंगी त्याला आपल्या डब्यातील जेवण देत. त्यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. मात्र ते सतत सिद्धराजला पुन्हा नेपाळला कसे पाठवता येईन याचा विचार करीत. इच्छा असली की मार्ग आपोआप सापडते. आणि चांगल्या कामासाठी देवही धावून येतो, असेच काहीसे रजक यांच्याबाबतीत घडले.

एक नेपाळी तरूण सुरजबहाद्दूर राऊत त्यांच्या आकुर्डी येथील नातेवाईकाकडे फिरण्यासाठी भारतात आला होता. यावेळी तो एका गाडीच्या चौकशीसाठी रजक यांना भेटला. तेव्हा त्यांनी सिद्धराजविषयी या सुरजकडे सांगितले. त्यालाही आपल्या या नेपाळी बांधवाबद्दल आपुलकी निर्माण झाली. त्याने त्यांच्या आकुर्डीतील नातेवाईकांच्या मदतीने फेसबुक तसेच नेपाळी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली. आणि सिद्धराजच्या नातेवाईकांचा पत्ता लागला.

त्यानंतर तयारी सुरू झाली सिद्धराजला आपल्या परिवाराकडे पुन्हा पाठविण्याची. पुण्यातील नेपाळी प्रवासी संघाने याची जबाबदारी घेतली. यावेळी स्टेशन मास्तर रजक यांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी सिद्धराजला नवे कपडे, चप्पल आणून दिले. तर तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस व नागरिक मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिल पालकर विठ्ठल सहाणे आदी स्वयंसेवक तसेच नेपाळी प्रवासी संघाने त्याला प्रवास खर्च तसेच त्याच्यावर उपचारासाठी खर्च दिला.

शाल, श्रीफळ आणि गांधी टोपी देऊन सिद्धराजला (रविवारी दि.21) निरोप देण्यात आला. मात्र यावेळी सिद्धराज व स्टेशन मास्तर रजक दोघांचेही डोळे पाणावले होते. माणुसकीच्या नात्याचे अनोखं दर्शन या घटनेतून घडलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.