Winter Session : आजपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन

शक्ती कायद्यासह दहा विधेयक पटलावर मांडली जाणार 

एमपीसी न्यूजमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महिला सुरक्षेशी संबंधित दोन शक्ती कायद्यासह पाच अध्यादेश आणि दहा विधेयक आज विधानसभेच्या पटलावर मांडली जाणार आहेत

कोरोनामुळे हे अधिवेशन दोनच दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन दिवसात सरकार महत्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्याच्या तयारीत आहे. यात प्रामुख्याने महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक शक्ती कायद्यासंदर्भातील विधेयकाचा देखील समावेश आहे. तर, विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे.

वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) सांगितले.

 

 

दरम्यान, राज्य सरकारने काल संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आयोजित केले होते. या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.