Bhosari News : कार चालकाला वाहतूक पोलिसाने अडवले म्हणून महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

0

एमपीसी न्यूज – कार चालवत असताना चालक मोबाईलवर बोलत होता. तसेच त्याने मास्कही घातला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करत असलेल्या महिला वाहतूक पोलिसाला चालकाने धक्काबुक्की केली.

तसेच पोलिसांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केला. याबाबत कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भोसरी येथे बुधवारी (दि. 9) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

मोहित देवेंद्र सिंग (वय 26, सध्या रा. खराबवाडी, चाकण, मूळ रा. जालोन, उत्तर प्रदेश), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाहतूक महिला पोलीस आहे. फिर्यादी बुधवारी सायंकाळी भोसरी येथे वाहतूक नियमन करीत असताना आरोपी कार मधून जात होता. कार चालवत असताना तो मोबाईल फोनवर बोलत होता तसेच त्याने मास्कही घातला नव्हता. त्यामुळे त्याला फिर्यादी यांनी थांबवले.

त्यानंतर ट्रॅफिक वॉर्डन सोहेल पठाण यांना आरोपीच्या कारमध्ये बसवून कार वाहतूक शाखेच्या नाशिक फाटा येथील कार्यालयात नेण्यास सांगितली. मात्र आरोपी सिंग याने त्याची कार पुणे-नाशिक रस्त्यावरील अंकुशराव लांडगे सभागृह समोर घेऊन गेला. त्यावेळी फिर्यादी यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाला फोन केला.

त्यानंतर भोसरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर व भोसरी मार्शल तेथे आले. त्यांनी आरोपीला सरकारी जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने दंगामस्ती केली. तसेच फिर्यादीशी झटापट केली. पोलिसांच्या वाहनाला लाथा मारल्या.

पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment