Bhosari news : अन महापालिकेने चर बुजविण्याच्या कामात ‘सीडी वर्क’ चे काम घुसडले

एमपीसी न्यूज  : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत रस्त्यावर विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले चर बुजविणे, पदपथाची दुरूस्ती करण्याचे काम ठेकेदाराला दिले असताना कोरोनाचे कारण पुढे करत त्याच कामाच्या निविदेत भोसरीतील सीडी वर्कचे (नाल्यावर स्लॅब टाकणे) काम घुसडण्यात आले. या कामावर तब्बल साडेसात कोटी वाढीव खर्च करण्यात आला आहे. वाढीव खर्चाला बुधवारी (दि.30) झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

टेल्को रस्त्यावरील दुर्गानगर चौक ते पुणे – नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्यावर विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले चर बुजविणे, पदपथाची दुरूस्ती करण्याच्या कामाचा आदेश कृष्णाई इन्फ्रा यांना  जानेवारी 2019 मध्ये देण्यात आला. त्यानुसार, ठेकेदाराने कामास सुरूवात केली.

हे काम सेवा वाहिन्यांसाठी खोदलेले चर पूर्ववत करण्यासाठी आहे. त्यानुसार, विविध सेवा वाहिन्यांसाठी आवश्यकतेनुसार खोदकाम केल्यानंतर चरांची दुरूस्ती करण्यात येत आहे. सद्यस्थितीत हे काम 80 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. भोसरी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी लांडेवाडी येथील दत्तमंदीर ते नाशिक महामार्गापर्यंत आदिनाथनगर येथे सीडी वर्क (नाल्यावर स्लॅब टाकणे) सन 2006-07 मध्ये बांधण्यात आले होते.

या सीडी वर्कची लांबी सुमारे 110  मीटर होती. त्याची उंचीही कमी असल्याने हे सीडी वर्क ब-याच वर्षापासून साफ करण्यात आले नव्हते. त्यामध्ये सुमारे साडेचार फुट उंचीचा गाळ, राडारोडा साचला होता. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची क्षमता खुपच कमी होऊन पाणी सखल भागात सुमारे 10 ते 12 फुट उंचीपर्यंत साठले होते. आदिनाथनगर, गव्हाणे वस्ती आणि आजुबाजूच्या परिसरातील घरामंध्ये पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडले.

हे काम पावसाळ्यापूर्वी आणि तातडीने करायचे होते. त्यातच कोरोना संकटामुळे नव्याने निविदा मागविणे शक्य नव्हते. त्यासाठी सीडी वर्क रस्ता दुभाजकामध्ये आणि रस्त्याकडेला तोडणे आणि सीडी वर्कची साफसफाई करणे.  तसेच नाशिक महामार्गापर्यंतचा नाला आणि त्यापुढील सीएमई मधील संपूर्ण नाल्याचे साफसफाईचे काम या रस्त्यावर चालू असलेल्या कामातूनच करण्यास आणि त्यासाठी येणा-या अंदाजे 1 कोटी 10 लाख रूपये खर्चास 15 एप्रिल रोजी मान्यता देण्यात आली. मात्र, सीडी वर्कचा स्लॅब तोडणे, साफ करणे, जुन्या सीडी वर्कची उंची वाढविणे, नव्याने स्लॅब टाकणे हे काम गुंतागुंतीचे असल्याने यासाठी पुन्हा 22 जून रोजी 1 कोटी 74 लाख रूपये खर्चास मान्यता देण्यात आली.

त्यांनतर बहूतांशी काम पूर्ण झाले आहे. परंतु, सीडी वर्कच्या दोन्ही बाजूस रॅम्पचे काम, सेवा रस्त्याचे काम, भराव टाकणे, रिटनिंग वॉल बांधणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी 5 कोटी 57 लाख रूपये खर्च येत आहे.
नवीन सन 2019-20  च्या दरसुचीनुसार नवीन निविदा मागवून कामाचे अंदाजपत्रक केले असता 6 कोटी 73 लाख रूपये खर्च अपेक्षित होता.

संबंधित ठेकेदाराने स्विकृत दरानुसार काम करण्यास सहमती दर्शविली आहे. या कामासाठी 5 कोटी प्रशासकीय मान्यता आहे. तसेच टेल्को रस्त्यावर दत्तमंदीर ते नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्यावर सीडी वर्क बांधणे आणि रस्ता करण्याच्या कामासाठी 10  कोटी प्रशासकीय मान्यता आहे. ही दोन्ही कामे एकत्रित करून तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार 7 कोटी 50 लाख रूपये वाढीव खर्चास स्थायी समिती सभेने  मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.