Pune : स्वयंसेवी संस्थांचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त सौरभ राव

पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करणा-या व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांचा गौरव

एमपीसी न्यूज – पुणे शहरात २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कात्रज, अरण्येश्वर, पद्मावती,सहकारनगर, बिबवेवाडी या भागात झालेल्या पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तेथील परिस्थिती सावरण्याकरिता व पूरग्रस्त बाधितांना करावयाची मदत, जीवनावश्यक साहित्याची मदत यासाठी पुणे शहरातील स्वयंसेवी संस्था, नागरिक, मंडळांचे कार्यकर्ते यांनी केलेली मदत ही अत्यंत मौलिक असून ही बाब प्रेरणादायी वाटली, अशा भावना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केल्या. तसेच या सर्व व्यक्ती/संस्था/स्वयंसेवी संस्थांची एकत्रित सूची तयार करून त्यांच्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वतंत्र व्यासपीठ तयार करावे, असेही सुचविले. 

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० अंतर्गत मेगा मिटींगचे आयोजन गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, महात्मा फुले पेठ या ठिकाणी करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते दि. २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत विविध पातळ्यांवर कार्य करणारे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांचा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. गौरव प्रमाणपत्र व आभार पत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वॅग अंतर्गत २ ऑक्टोबर २०१९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण व स्वच्छता अभियानात कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्थांचा या प्रसंगी गौरव प्रमाणपत्र व आभार पत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त माधव देशपांडे तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त सौरभ राव पुढे म्हणाले की, स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० च्या अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. मनपा बरोबरच नागरिक, विविध संस्था यात कार्यरत आहेत. परंतु दैनंदिन कामकाज करित असताना काही ठिकाणी कचरा, घाण निदर्शनास येते. त्यामुळे खंत निश्चित वाटते. यास्तव जास्तीत जास्त प्रमाणात कामकाज व त्याच्या नियोजनाबाबत सतर्क राहून तसेच स्वच्छ सर्व्हेक्षणाअंतर्गत निकषांवर लक्ष केंद्रीत करून नागरिकांचा सहभाग वाढविणेकरिता तसेच २० प्रश्नांबाबत जनजागृती, नागरिकांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद, घरोघरी कचरा संकलन, ओला व सुका कचरा वेगळा करणे, शौचालयांची स्वच्छता, शौचालयातील सुविधा, शौचालयांचा वापर अशा विविध मुद्यांबाबत कार्यरत रहाणे व गुणात्मक दर्जा राखणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील स्वच्छता व नागरिकांचा सहभाग यात नक्कीच सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण-२०२० लीग स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व पातळ्यांवरुन स्थानिक स्वराज्य संस्था हिरीरीने सहभागी होत आहेत.

निरंकारी स्वयंसेवी संस्थांसारख्या पुणे शहरात विविध स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, अशा कामी त्यांची मदत निश्चित होत असते. केलेल्या कामांचे गुणात्मक परिक्षण होणेच्या दृष्टीने थर्ड पार्टी सोशल ऑडिटद्वारे निरीक्षण झाल्यावर व त्याप्रमाणे बदलाच्या नोंदी घेऊन गुणात्मक दर्जा देऊन स्वच्छता विषयक कामे केल्यास एकूणच स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० च्या अनुषंगाने पहिला क्रमांक निश्चित प्राप्त होईल. तसेच मनपा व स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित सहभागाने ध्येय निश्चित गाठले जाईल यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) शांन्तनु गोयल यांनी व्हिजन शून्य ते शंभर व प्लास्टिक बंदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ‘‘कचरा कसा कमी करावा या विषयावर अॅपेक्स कमिटीच्या प्रतिनिधी श्यामला देसाई यांनी मार्गदर्शन केले. तसेच कचरा निर्मूलना संदर्भात सेवानिवृत्त विंग कमांडर पुनित शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० व क्षेत्रिय कार्यालयांचा एमआयएस आढावा सादरीकरणानुसार उपायुक्त माधव जगताप यांनी सविस्तर माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन विभागामधील सेवानिवृत्त कर्मचारी गिरीष बेलसरे यांनी घनकचरा विषयाबाबत पौड येथील कचरा डेपो ते उरुळी कचरा डेपो येथील कचरा निर्मूलन व बदलती परिस्थिती याविषयी अनुभव कथन केले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी प्रास्ताविकपर स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० बाबत माहिती दिली. याप्रसंगी उपस्थितांनी ‘‘स्वच्छता” शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरती दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. केतकी घाडगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.