Walhekarwadi News : जगाच्या उभारणीत संतांचे कार्य महान – शंकर महाराज शेवाळे

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त भजन किर्तन

एमपीसी न्यूज –  समाज, राष्ट्र, जगाच्या उभारणीत संतांचे कार्य महान आहे. संताचे कार्य हे लोकोध्दाराचे कार्य आहे. संत हे जगाच्या कल्याणासाठीच जन्माला आले. त्यांनी विश्वकल्याणासाठी केलेले कार्य कितीही पिढ्या बदलल्या तरी सर्वांना सर्व काळात लागू पडणारे आहे, असे मत  शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केले.

वाल्हेकरवाडीतील रजनीगंधा हौसिंट सोसायटीमधील श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त देवस्थानाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. सलग पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तीन दिवस सलग पोथीचे पारायण झाले. प्रकटदिनसोहळ्यात कीर्तन झाले. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, उद्योजक ओमप्रकाश पेठे, नाना चिंचवडे आदी उपस्थित होते.  शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन झाले.

शेवाळे महाराज म्हणाले, ‘‘गुरुचा बेटा कोणाला म्हणावे  तर जो अध्यात्मातील अनेक कूट आणि गूढ प्रश्न जाणतो त्याला गुरूचा बेटा असे म्हणतात.’’ महाराजांनी कीर्तनात दिंडीचा आध्यात्मिक अर्थ काय. वारी का करावी,  दिंडीत संत आले म्हणजे कुठले संत आले? त्यांच्या हातात खुरे आणि काखेत मुंडके कोणाचे आहे? व संतांनी ते हातात व काखेत का धरले आहे, पंढरपुरात कसली होड पडली आहे. धांगड गोड कशी? वैष्णवांची मांदिचा अर्थ काय ? त्या वैष्णवांनी मेलेले डुक्कर खांद्यावर घेतले म्हणजे काय ? वारीचा मार्ग उलटा आहे. हा मार्ग जगरहाटी पेक्षा भिन्न असून श्रेयस्कर कसा आहे. ह्या सर्व प्रश्नांचा गर्भित अर्थ सांगितला.

मोहक फुलांची सजावट, महाप्रसाद वाटप  

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या दिवशी विविध कार्यक्रम झाले. मंदिरात मोहक फुलांची सजावट केली होती. पोथीचे पारायण झाले. तसेच भजन आणि भक्तीसंध्या कार्यक्रम झाला. प्रकटदिनी लघुरूद्र अभिषेक, नियमित आरती, स्वामी याग झाला. संजय कुलकर्णी यांनी पौराहित्य केले.  प्रकटदिनसोहळा, प्रसाद वाटप आणि रजनीगंधा महिला मंडळ सुजाता चिंचवडे संचालित भजनांचा कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर नियमित आरती, मुकुंद बाद्रायणी यांचा स्वर समर्थ अभंगवाणीचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमांचे संयोजन गोरोबा कोल्हे, सागर चिंचवडे, यशराज चिंचवडे, दिलीप कोकरे, संजय रंवदळ, दशरथ सोनवणे, रणजित भापकर, प्रकाश चव्हाण, सुनिल पिंपळे,   शंकरराव सावंत, मारुती माळी, बाळासाहेब माने, सुनील काळे, वैजिनाथ माळी, सुशील पिंगळे, रवींद्र कुरवडे, संदीप महाले,अनिल सोनवणे, भगवान सोले, स्वप्निल आव्हाळे, हितेश सरोदे, कुमार चव्हाण, दीपक पाटील, सूर्यकांत दिवेकर, शंकरराव मुळीक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.