Nigdi News : पेंटिंग कामगाराने सुट्टी घेतल्याने कामगारास लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – पेंटिंगचे काम करणा-या कामगारांनी सुट्टी घेतली. त्यावरून एकाने कामगारांना सुट्टी घेतल्याबाबत हटकले. त्यातून त्यांच्यात वाद झाला. हटकणा-या ति-हाईत व्यक्तीने कामगाराला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी कामगार नाका, अंकुश चौक, निगडी येथे घडली.

विकास मोरे असे जखमी कामगाराचे नाव आहे. याबाबत सुरज मंगलसिंग राजपूत (वय 30, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिद्धार्थ वाघमारे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज, त्यांचा जखमी मित्र विकास मोरे आणि शिवा हे तिघेजण पेंटिंगचे काम करतात. त्यांनी चाकण एमआयडीसी येथे विनोद शेठ यांच्याकडे तीन दिवस पेंटिंगचे काम केले होते. त्या कामाचे पैसे घेण्यासाठी ते मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अंकुश चौक, निगडी येथे कामगार नाक्यावर थांबले होते.

त्यावेळी आरोपी सिद्धार्थ तिथे आला. त्याने फिर्यादी यांच्याजवळ येऊन ‘तुम्ही आज सुट्टी का घेतली. मी विनोद शेठला फोन करून तुमच्या कामाचे पैसे द्यायला सांगतो’ असे म्हटले. त्यावर विकास मोरे यांनी आरोपीला म्हटले की, ‘तू कशाला फोन लावतोस. आमचे आम्ही बघून घेऊ.’

त्यावरून राग आल्याने सिद्धार्थ याने शेजारी पंक्चरच्या दुकानातील लोखंडी रॉडने विकासच्या डोक्यात मारले. त्यात विकास गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी सिद्धार्थ पळून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.