Pimpri News: ‘ठेवले नाही कामगारांना हक्क, उखडून टाकू दिल्लीचे तख्त’; कामगारांचा एल्गार

एमपीसी न्यूज – कामगार, शेतकरी कायद्यांमध्ये मोदी सरकारने अत्यंत मूलभूत असे कामगार विरोधी बदल केल्याचा आरोप करत कामगार संघटना आज (गुरुवारी) रस्त्यावर उतरल्या असून एकदिवसीय संप पुकारला आहे. पिंपरीत कामगारांनी मोठी मानवी साखळी केली.  ‘ठेवले नाही कामगारांना हक्क, उखडून टाकू दिल्लीचे तख्त’, ‘चालू कंपन्या चीनच्या घशात घालणा-या सरकारचा जाहीर निषेध’ असे फलक हातामध्ये घेत कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम, अनिल रोहम, मानव कांबळे, मारुती भापकर आदी यावेळी उपस्थित होते. कामगार संघटना संयुक्त कृती समिती देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील इंटक, आयटक, सिटू, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, युटीयुसी, इत्यादी सर्व केंद्रीय कामगार संघटनांशी संलग्न तसेच स्वतंत्र  कामगार  संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

सरकारने कामगार विरोधी बदल केलेले असून, कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन अत्यंत बेलगामपणे संरक्षण –विमा-बँकांसारख्या मूलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमदेखील विकून टाकण्याच्या देशविरोधी हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे.

कोरोना काळात कोट्यावधींचा रोजगार गेलेला आहे. त्यांना तात्काळ साहाय्य देण्याची गरज आहे.  त्याच वेळी शेतकऱ्यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदेदेखील केल्याचा आरोप करत कामगार, शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहेत. एक दिवसाचा सार्वत्रिक संप पुकारला असल्याचे कामगारांनी सांगितले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मानवी साखळी करण्यात आली. पिंपरी चौकातून मोरवाडीपर्यंत मानवी साखळी केली होती. रस्त्याच्या दोनही बाजुने  साखळीत कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ”स्वदेशी उत्पादक, मेक इन इंडियाचा नारा देणा-या सरकारकडून आपल्या चालू कंपन्या चीनच्या घशात घालणा-या सरकारचा धिक्कार असो”, ”मागे घ्या, मागे घ्या कामगार विरोधी लेबर कोड मागे घ्या”, ”ठेवले नाही कामगारांना हक्क, उखडून टाकू दिल्लीचे तख्त”, ”कामगार वाचवा, देश वाचवा”, ”शेतकरी विरोधी निर्णय घेणा-या सरकारचा निषेध असो” असे फलक हातामध्ये घेतलेल्या कामगारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.