BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अन् गळफास लावून घेतल्यानंतरही तो बचावला!

बिट मार्शलच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज – पर्वती दर्शन भागात राहणा-या एका तरुणाने दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिट मार्शलच्या कार्य तत्परतेमुळे आत्महत्या करणा-या तरुणाचे प्राण वाचले. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवरून बिट मार्शल कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार आणि अनिल लांडे यांनी तात्काळ संबंधित व्यक्तिचे घर शोधून त्याला फासावरून उतरवून तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आणि आता हा तरुण सुस्थितीत पोहोचला आहे. 

या तरुणाच्या पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला आपले पती दारुच्या नशेत असून ते आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती दिली होती. या तरुणाने त्यांच्या पत्नीला आपण आत्महत्या करीत असून तू घरी येईपर्यंत माझा मृतदेहच तुला मिळेल, असा संदेश पाठविला होता. संदेश वाचून त्यांनी आपल्या पतीला फोन लावला असता त्याने फोनवरही तेच सांगितले. हे ऐकूण या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार आणि अनिल लांडे हे पर्वती दर्शन भागात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिट मार्शल ड्यूटी करीत होते. यावेळी त्यांना नियंत्रण कक्षाकडून पर्वती दर्शन चाळ नंबर 51 मध्ये एकजण गळफास लावून घेत आहे, असा संदेश मिळाला. संदेश मिळताच त्यांनी अतिशय तत्पर कारवाई करीत हे घर शोधून काढले. यावेळी त्यांना एका घराच्या खिडकीतून एक व्यक्ती घराच्या छताला लाल ओढणीने स्वतःला गळफास लावून घेतले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांच्या घराचा लोखंडी दरवाजा तोडून या व्यक्तीला गळफासावरून खाली उतरवले. आणि तात्काळ हरजीवन हॉस्पिटल व त्यानंतर पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अगदी वेळेवर उपचार मिळाल्याने अखेर या तरुणाचे प्राण वाचले असून तो आता सुस्थितीत आहे.

त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळवून त्यांना रुग्णालयात बोलवून घेतले. यावेळी त्यांच्या पत्नीने आपल्या पतीचे दारुच्या नशेत मानसिक संतूलन ढासळले असल्याने ते नेहमीच आयुष्य संपवण्याचा विचार करीत असतात, अशी माहिती दिली. तसेच, बीट मार्शल वेळेत पोहोचून आपल्या पतीचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

दरम्यान, बिट मार्शल कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार आणि अनिल लांडे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3