Pune News : हळदीच्या कार्यक्रमात स्पीकर लावण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : हळदीच्या कार्यक्रमात स्पीकर लावण्यास नकार दिल्यामुळे एकावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शांतीनगर परिसरात 11 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अनिल जनार्दन कांबळे (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक शांतीनगर परिसरात एकत्र जमले होते. यावेळी त्या परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन तरुणांनी फिर्यादी यांच्या पुतण्याला स्पीकर लावायला सांगितले.

परंतू फिर्यादीच्या पुतण्याने स्पीकर लावला नाही. त्यामुळे चिडलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांनी फिर्यादी आणि त्यांच्या पुतण्याला कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.  विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.