Chakan : नदी पात्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या 

वाकी गावच्या हद्दीतील घटना , कारण अस्पष्ट 

एमपीसी न्यूज – भीमा नदीच्या पात्रात उडी मारून बावीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी, भाम ( ता. खेड ) गावच्या हद्दीत घडला.मयत तरुणाने अगदी टोकाचा निर्णय घेवून केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, येथील पोलिसांनी शुक्रवारी ( दि. 4 जानेवारी ) अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

पंकज अशोक कदम ( वय – 22 वर्षे, सध्या रा. आंबेठाण रोड, चाकण. ता. खेड, मूळ रा. पुसेसावळी, ता. खटाव, जि. सातारा, ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश गणेश पडशनकर ( वय – 19 वर्षे, रा. चाकण.) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबतचे अधिक वृत्त असे की, पंकज याने गुरुवारी ( दि. 3 जानेवारी ) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी, भाम ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात उडी मारली. यावेळी जवळच असलेल्या काही नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तो खोल पाण्यात असलेल्या चिखलात रुतून बसला. पाण्यात उतरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री उशिरा पर्यंत त्याचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने सुदुंबरे येथील एनडीआरएफच्या पाणबुडी शोध पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या शोध पथकाने शुक्रवारी ( दि. ४ जानेवारी ) सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान पंकज याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. चाकण पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून सबंधित तरुणाचा मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

चाकण ग्रामीण रुग्णालयात सबंधित तरुणाच्या मृदेहाचे विच्छेदन होताच अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याने येथील पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. पंकज कदम याच्या मागे आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, पोलीस हवालदार प्रमोद भोसले व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.