Nigdi : अर्थसत्तेसाठी युवकांनी उद्योगांकडे वळावे – राजेश सांकला

निगडी प्राधिकरणात चातुर्मासानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी  न्यूज – संतांनी दाखविलेल्या मार्गावरून जीवन प्रवास करताना सर्व बाजूंनी समाजाचा विकास होणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी धर्माला राजाश्रयाची गरज होती. सध्या परिस्थिती बदलली आहे. उद्योग- व्यवसाय ज्यांच्या हातात आहेत, त्यांच्याकडेच अर्थव्यवस्थेचा ताबा आहे. त्यामुळे युवकांनी अर्थकारणात पुढे येऊन स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारावेत. जेणेकरून अर्थसत्ता तुमच्या ताब्यात येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही धर्माचा अर्थात समाजाचा विकास करू शकाल, असे मार्गदर्शन ज्येष्ठ उद्योजक राजेश सांकला यांनी व्यक्त केले. 
पवित्र चातुर्मासानिमित्त कोटा संघ प्रमुख नवकार आराधिका प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांना निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशन (जेएसओ) यांच्या वतीने ‘महाराष्ट्र सिंहनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष मनोहरलाल लोढा, निमंत्रक नितीन बेदमुथा, जेएसओचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी, संतोष धोका, सुभाष ललवाणी, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जिटो) पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, विनोद मुथा आदींसह महाराष्ट्र तसेच देशरातून आलेले जैन बंधू आणि भगीनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प. पू. प्रफुल्लाजी म. सा., प.पू. हंसाजी म. सा., प. पू. पुनितजी म. सा., प. पू. गरिमाजी म. सा., प. पू. महिमाजी म. सा. आदी उपस्थित होते.

राजेश सांकला म्हणाले की, स्पर्धेच्या युगात युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसायात यावे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जितो) अशा युवकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावरून युवा उद्योजक आणि व्यावसायिक जागतिक स्पर्धा करू शकतात. स्पर्धेत तग टिकायचे असेल तर संघटन महत्वाचे आहे. युवक संघटीत झाल्यास समाज संघटीत होईल. हे संघटन म्हणजे तुम्हाला यशाचे शिखर गाठून देईल.
स्वागत अध्यक्ष मनोहरलाल लोढा यांनी केले. तर प्रास्ताविक करताना नितीन बेदमुथा यांनी केले. शारदा चोरडीया यांनी सूत्रसंचालन केले. तुषार मुथा यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.