Pune News : पैशासाठी तरुणाला चार दिवस डांबून ठेवले, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : उसने दिलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला चार दिवस एका खोलीत डांबून ठेवले असा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला. 

पोलिसांनी या प्रकरणी सनी सुनील छजलानी (वय 31) आणि सलमान उर्फ उमर समीर शेख (वय 24) या दोघांना अटक केली आहे. तर शादाब, मयूर, अभिजीत, आणि पक्या अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल चव्हाण (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भावाने सनी छजलानी याच्याकडून व्यवसायासाठी उसने पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला होता. दरम्यान 10 जानेवारी रोजी फिर्यादी सिंहगड रस्ता परिसरातील एका कॅफे मध्ये असताना सनी इतर आरोपींना घेऊन त्या ठिकाणी आला.

त्यानंतर मारहाण करत त्याने फिर्यादीचे अपहरण केले. त्यानंतर त्याला चार दिवस एका खोलीत डांबून ठेवले. पैसे परत नाही दिले तर ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान 14 जानेवारी रोजी सुटका झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.