Pune University News : …तर कार विकून टाकेन आणि बसने प्रवास करेन : डॉ. नितीन करमळकर 

एमपीसी न्यूज : “तुम्हाला जर बससेवा वेळच्या वेळी मिळाली तर..” असे विचारताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी क्षणाचाही विलंब न करता ”..तर मी माझी कार विकून टाकेन आणि बसने प्रवास करायला सुरुवात करेन” असे विधान केले. 

निमित्त होते पीएमपीएमएलबाबतच्या सर्वेक्षणाचे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व  पीएमपीएमएल यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला असून या करारानुसार विद्यपीठाचे विद्यार्थी बससेवेविषयक समस्यांबाबत सर्वेक्षण करत आहेत. विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील एकूण 20 विद्यार्थी विविध वयोगटातील तसेच विविध आर्थिक स्तरातील नागरिकांचे पीएमपीएमएल च्या सुविधांबाबत सर्वेक्षण करत आहेत.

बुधवार दि. 18 ऑगस्ट रोजी मधुरा गुंजाळ या विद्यार्थिनीने विद्यापीठाच्या कुलगुरूंना प्रश्न विचारत माहिती घेतली. त्यावेळी डॉ. करमळकर बोलत होते. पुणे शहरातील तीन हजार तर पिंपरी चिंचवड शहरातील दोन हजार नागरिकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये सार्वजनिक बसने प्रवास करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच नवीन सुविधांबाबतही नागरिकांची मते जाणून घेण्यात येत आहेत.

हे सर्वेक्षण समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्त्री अभ्यास केंद्र संचालक डॉ. अनघा तांबे यांच्या पुढाकाराने होत आहे. कोट सार्वजनिक वाहतूक आता आहे त्यापेक्षा अधिक सक्षम झाली तर वैयक्तिक वाहने कमी होतील आणि याचा नक्कीच पर्यावरणाला फायदा होईल. या कामासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा वाटा आहे ही अत्यंत कौतुकाची बाब आहे असे डॉ. नितीन करमळकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.