Corona Update : महाराष्ट्रातील या 11 शहरांत दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली असून, मंगळवारी तब्बल 35 हजार 949 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर दुसरीकडे दिवसभरातील मृत्यूंची 477 ही संख्या थोडी चिंता वाढविणारी असली, तरी औरंगाबाद ग्रामीण, ठाणे, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, भंडारा, गडचिराेली अशा 11 शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

राज्यात मंगळवारी 14 हजार 123 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या 2,30,689 इतकी झाली आहे. नव्या बाधितांची संख्या वीस हजारांखाली आल्याने मागीलवर्षीच्या उच्चांकी रुग्णसंख्येवरून बाधितांचा आलेख उतरणीला लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्क्यांवर गेल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका झाल्याचे पाहायला मिळते.

रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होऊ लागल्याने मंगळवारपासून अनेक शहरांत दुकाने उघडण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे बाजारपेठ महिनाभरानंतर पुन्हा गजबजू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मंगळवारी एकही बाधित रुग्ण आढळला नाही, तर भिवंडी, परभणी शहरात प्रत्येकी 7, तर जळगाव शहरात केवळ आठ नवे रुग्ण आढळले आहेत.

तर ठाणे, उल्हासनगर भिवंडी, मीरा-भाईंदर, औरंगाबाद ग्रामीण, धुळे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, गोंदिया या शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर कल्याण-डोंबिवली, पनवेल, जळगाव आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.