Pimpri : ‘व्हीप’चे उल्लंघन करणा-या नगरसेवक काटे, लांडगे, कामठे यांच्यावर कारवाई नाही – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडणुकीसाठी भाजपने पक्षादेश (व्हीप)बजावूनदेखील निवडणुकीला अनुपस्थित राहणा-या भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, रवी लांडगे आणि तुषार कामठे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या तीनही नगरसेवकांनी समाधानकारक खुलासा सादर केला आहे, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

महापौर, उपमहापौर यापदाकरिता शनिवारी (दि.4) निवडणूक झाली. महापौरपदाची उमेदवारी आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव यांना जाहीर झाली होती. निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी ‘व्हीप’ बजावला होता. या निवडणुकीत महापौर आणि उपमहापौरपदी भाजपचे अनुक्रमे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे हे विजयी झाले. मात्र, हा ‘व्हीप’ बजावूनदेखील या पदाकरिता तीव्र इच्छूक असलेले शत्रुघ्न काटे यांच्यासह रवी लांडगे आणि तुषार कामठे महासभेला अनुपस्थित राहिले. त्यामुळे व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती.

या तीनही नगरसेवकांच्या अनुपस्थितीची कारण संयुक्तिक असून, ती मान्य करण्यात आली आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शत्रूघ्न काटे हे रुग्णलयात उपचार घेत होते. तर, रवी लांडगे हे शहराबाहेर गेले होते. याशिवाय तुषार कामठे हे कौटुंबिक कारणास्तव महासभेला अनुपस्थित राहिले होते. ही कारणे संयुक्तिक वाटल्याने या तीनही नगरसेवकांवर भाजपकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे, एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.