Pune News : शहरात संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही!, कोरोना नियंत्रणासाठी कडक निर्बंध पुरेसे

एमपीसी न्यूज : शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ह्या पथकाने विविध बाबीचा आढावा घेतला असून त्यानंतर सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानुसार शहरात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध कोरोना नियंत्रणात आण्यासाठी पुरेसे असून तूर्तास शहरात संपूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचे म्हटले आहे. 

या केंद्रीय पथकात नोडल अधिकारी आणि पुणे पालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार, डॉ. जुगल किशोर आणि डॉ. घनःश्याम पांडे यांचा  समावेश होता.

या अहवालामध्ये सगळ्यात पहिल्याच मुद्द्यामध्ये पुण्यातल्या तीनही यंत्रणा म्हणजे पुणे महापालिका , पिंपरी महापालिका तसेच ग्रामीण यांच्या मध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे म्हणले आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकच केंद्रीय यंत्रणा किंवा कॉल सेंटर असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यासाठी एकच बुलेटिन काढले जावे असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. बेड उपलब्धतेचा गोंधळ लक्षात घेता 95 च्या वर ॲाक्सिजन असणाऱ्या सर्वांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात यावे किंवा ते रुग्णालयात असतील तर त्यांना डिस्चार्ज दिला जावा, अशीही सूचना करण्यात आली आहे.  याबरोबरच दर दिवशीचे पॉझिटिव्ह पेशंट पाहून त्यानुसार नवे बेड तयार ठेवले जावेत, असंही केंद्रीय पथकाने म्हटलं आहे.

सीटी स्कॅनचा वापर हा योग्य प्रमाणात केला जावा सरसकट स्कॅनची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आवश्यकता आहे तेवढीच लसीकरण केंद्र सुरु करावीत, असे सांगत केंद्रातून केल्या जाणाऱ्या लस पुरवठ्याचा प्रश्न सोडवला जावा तसेच जर पुरेशा लस नसेल तर मोठ्या प्रमाणात लसीकरण करु नये, अशी सूचना देखील करण्यात आली आहे.

सर्व रुग्णालयांच्या बाहेर माहिती देणाऱ्या बोर्डाचा अभाव असल्याची नोंद देखील या पथकाने केली आहे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर दिल्ली प्रमाणे स्क्रीन उभारले जावेत, अशी सूचना पथकाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय वॉर रुमची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. महत्वाचे म्हणजे केंद्रीय पथकाने आत्ताचे निर्बंध पुरेसे असून पूर्ण लॉकडाउनची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.