Pune : प्रत्येक मंत्र्याच्या घरात बासरी वाजायला हवी ! – पं. हरीप्रसाद चौरासिया

सवाई संधर्व भीमसेन महोत्सवातील 'षड्ज' व 'अंतरंग' कार्यक्रमांना सुरूवात

एमपीसी न्यूज – ‘‘बासरी हे वाद्य योगाप्रमाणे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते आणि त्याबरोबरच आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न ठेवते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या घरात बासरी वाजायलाच हवी, पण खास करून प्रत्येक राजकारण्याच्या आणि मंत्र्याच्या घरात वाजायला हवी. म्हणजे भांडणतंटे दूर राहतील आणि ‘हार्मनी’ निर्माण होईल.’’, अशी मिश्किल टिप्पणी ज्येष्ठ बासरीवादक पं. हरीप्रसाद चौरासिया यांनी केली.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या ‘षड्ज’ या शास्त्रीय संगीतावरील लघुपट महोत्सवास, तसेच ‘अंतरंग’ या संवादात्मक कार्यक्रमास बुधवारी सुरूवात झाली. सवाई गंधर्व स्मारक येथे चार दिवस चालणा-या या खुल्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रख्यात गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत घेतली.

‘‘माझ्या वादनाची श्रोत्यांकडून तारीफ होत असली तरी मी स्वतःला यशस्वी मानत नाही. सतत प्रयत्न करत राहणे आणि शिकत राहणे मला महत्त्वाचे वाटते.’’, अशा विनम्र भावना चौरासिया यांनी व्यक्त केल्या आणि प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

भारतीय शास्त्रीय संगीताला मिळणा-या प्रतिसादाबद्दल बोलताना चौरासिया म्हणाले, की सर्वांना हे संगीत निश्चितपणे आवडू शकते. मात्र कोणत्या श्रोतृगटासमोर काय गावे अथवा वाजवावे याचा अभ्यास कलाकाराने करणे आवश्यक आहे. तरच वेगवेगळ्या प्रकारच्या रसिकांपर्यंत हे संगीत पोहोचवता येईल.

बासरी हे महिलांनी वाजविण्याचे वाद्य नाही, असा एक मतप्रवाह आहे. याबद्दल चौरासिया म्हणाले, ‘‘माझ्या अनेक महिला शिष्या असून त्या उत्तम बासरी वाजवतात. हे वाद्य शिकण्यात कोणताही लिंगभेद नाही.’’

‘‘माझे अनेक परदेशी शिष्यही असून त्यांच्यापैकी काहींनी सॅक्सोफोन किंवा ट्रंपेट वाजवणे सोडून बासरी हाती घेतली आहे. ते आपल्याप्रमाणेच राहण्याचा आणि विनम्रतेने शिकण्याचा प्रयत्न करतात हे पाहून चांगले वाटते. माझ्या सर्व शिष्यांना मी मित्र किंवा माझ्या परिवाराचे सदस्यच समजतो.’’, असेही चौरासिया यांनी सांगितले.

आपल्या बासरी शिक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘मी प्रथम भोलानाथजींकडे शिकलो आणि नंतर ज्येष्ठ सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांच्याकडे शिकण्याची संधी मला मिळाली. मी बासरी वाजवत असल्याने प्रथम त्या मला शिकविण्यास इच्छुक नव्हत्या. मात्र मला त्यांच्याकडून संगीत आणि त्यामागील विचार आत्मसात करायचा आहे, हे पटवून दिल्यानंतर त्यांनी मला शिकवण्यास सुरूवात केली. त्या उत्तम गात असत आणि प्रसंगी सूरबहार आणि सतार वाजवून शिकवत. अजूनही त्यांच्या तसबिरीसमोर बासरी वाजवताना मला धन्यता वाटते.’’

या वेळी ‘षड्ज’ अंतर्गत दिग्दर्शक व्ही. पाकिरीसामी यांचा ‘पंडित रामनारायण – अ ट्रिस्ट विथ सारंगी’ व एस. एन. शास्त्री दिग्दर्शित ‘उस्ताद अमीर खाँ’ हे लघुपट दाखविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.