Bhosari : शहरात नामांकित शिक्षण संस्था होणार, आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांना यश – महापौर जाधव

स. नं. 539 चिखली येथे साकारणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

एमपीसी न्यूज – पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पिंपरी-चिंचवड सुद्धा एज्यूकेशनल हब म्हणून ओळखले जावे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नामांकित शिक्षण संस्था याव्यात यासाठी त्यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्राधिकरणाच्या हद्दीतील पाच एकर क्षेत्रफळाचे पाच भूखंड राखीव करण्यात आले आहेत. चिखली येथील शासकीय गायरान जागेवर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील 13 एकर जागा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हस्तांतरीत करण्यात आली असल्याचे मत पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे झालेल्या कोपरा सभेत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, भाजपचे नगरसेवक बाबू नायर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेनेचे कुणाल जगनाडे, सचिन सानप, परशुराम आल्हाट, योगेश बोराटे, वैशाली खाड्ये आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर जाधव म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. राज्यासह देश विदेशातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. मात्र, याच पुण्याच्या भाग असलेले आणि आता वेगाने विकसित होणारे पिंपरी-चिंचवडसुद्धा एज्यूकेशनल हब म्हणून ओळखले जावे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. त्यासाठी पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेज, डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी), सर परशुराम महाविद्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी (एसएनडीटी) महाविद्यालय अशा नामांकित संस्थांच्या शाखा पिंपरी-चिंचवडमध्ये उभारल्या जाव्यात यासाठी आमदार लांडगे राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.

राज्यसरकारच्या नगररचना विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहरात पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 5 एकर क्षेत्रफळाचे 5 भूखंड राखीव करण्यात आले आहेत, असे महापौर म्हणाले. भोसरी व्हिजन 2020 या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये उपलब्ध करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे, असे सांगून महापौर जाधव म्हणाले की, राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील नामांकित शासकीय शिक्षण संस्था असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यासंस्थेच्या शाखेचा विस्तार भोसरीत व्हावा यासाठी आमदार लांडगे यांनी जिल्हा प्रशासन तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून चिखली येथील शासकीय गायरान जागेवर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील 13 एकर जागा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हस्तांतरीत करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वैद्यकीय क्षेत्रात ओळख निर्माण व्हावी अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पदव्युत्तर वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला. त्यास यश आले असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परवानगीने बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर वायसीएममध्ये महाविद्यालय सुरु होत आहे. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयात एमएस दर्जाचे डॉक्टर उपलब्ध होतील. या महाविद्यालयामुळे शहरातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like