Thergaon : तत्पर महिलेने हाणून पाडला चिमुकल्याच्या अपहरणाचा डाव

एमपीसी न्यूज – थेरगावमधील एका चौकात अवघा अडीच वर्षाचा चिमुकला रडत बसला होता. त्याच्या रडण्यावरून तो हरवला असल्याचे जाणवल्याने एका तत्पर महिलेने चिमुकल्याची विचारपूस केली. पण, तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, तो मुलगा माझाच असल्याची बतावणी करणारा एक इसम आला आणि मुलगा हिसकावून घेऊ लागला. महिलेने त्याला पोलीस ठाण्यात मुलाची कागदपत्रे जमा करून मुलाला घेऊन जाण्याबाबत सांगितले. ताबा सांगणारा इसम पोलीस चौकीपर्यंत आला. पोलिसांनी त्याला कागदपत्रे मागताच त्याने मुलाची कागदपत्रे आणण्याचे कारण सांगून धूम ठोकली, तो परत आलाच नाही. काही वेळाने चिमुकल्याची आई धावत पळत पोलिसांकडे आली. तत्पर महिलेने चिमुकल्याच्या अपहरणाचा डाव उधळून लावत पोलिसांच्या मदतीने चिमुकल्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.

सोमवारी (दि. 2) सकाळी थेरगाव येथील एका चौकात अडीच वर्षांचा चिमुकला(ऋषी) रडत-रडत रस्त्याने जात होता. तिथेच असलेल्या एका भंगार व्यावसायिकाने त्याला पाहिले आणि आपल्या दुकानावर घेऊन गेला. काही वेळेनंतर भंगार व्यावसायिकाने सापडलेल्या मुलाबाबत संपूर्ण गल्लीत विचारणा केली. ही वेळेतच थेरगाव परिसरात मुलगा सापडल्याची माहिती पसरली. दरम्यान, व्यावसायिकाने चिमुकल्याला आपल्या दुकानाच्या बाजूला बसवले आणि तो त्याच्या कामात व्यस्त झाला. ऋषी एकसारखा रडत होता. त्यावेळी तत्पर महिला नीरजा मोहित माने तिथून जात होत्या. ऋषीच्या भोवती जमलेली गर्दी पाहून नीरजा देखील तिथे थांबल्या.

ऋषी हा हरवला असून त्याच्या पालकांचा शोध सुरु असल्याचे त्यांना समजले. गर्दीत उभं राहून केवळ बघ्याची भूमिका न घेता त्यांनी ऋषीला उचलून घेतले. त्याच्या अंगावर केवळ शर्ट होता. नीरजा यांनी त्याच्यासाठी पॅन्ट खरेदी केली. त्याला चॉकलेट घेऊन दिले. त्याचे अश्रू पुसून त्याला शांत केले. ऋषीला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही वेळाने एक संशयित व्यक्ती नीरजा यांच्याकडे आली. त्या व्यक्तीने ‘ऋषी हा आपला मुलगा आहे. मी दारू पित असल्यामुळे माझे आणि माझ्या बायकोचे भांडण झाले आहे. ती मला सोडून गेली. मुलगा आता माझ्याकडे असतो.’ अशी बतावणी केली. नीरजा यांना त्याचा संशय आला.

नीरजा यांनी त्या व्यक्तीला पोलिसांना मुलाच्या जन्माची कागदपत्रे दाखवून मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. यावरुन तो व्यक्ती नीरजा यांच्याशी भांडू लागला. त्याने मुलाला ओढून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तो नीरजा यांच्यासोबत पोलीस चौकीत येण्यासाठी तयार देखील झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी देखील ऋषी त्याच व्यक्तीचा असून त्याला त्या व्यक्तीकडे देण्याची विनंती केली. पण, नीरजा यांना त्या व्यक्तीचा दाट संशय आल्याने त्यांनी पोलिसां समक्ष जाऊनच याचा निवाडा करण्याचे ठरवले. नीरजा, ऋषी आणि संशयित व्यक्ती थेरगाव पोलीस चौकीत आले.

थेरगाव पोलिसांनी त्या व्यक्तीकडे ऋषीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी व्यक्तीने स्वतःचे आधारकार्ड पोलिसांना दाखवले. पोलिसांनी मुलाची कागदपत्रे मागितली असता त्याने ‘कागदपत्रे घरी आहेत. ती घेऊन येतो’, म्हणून पोलीस चौकीतून धूम ठोकली. बराच वेळ गेला तरी तो व्यक्ती कागदपत्रे घेऊन न आल्याने तो आपली फसवणूक करत असल्याचा संशय खरा ठरल्याचे नीरजा यांना निश्चित झाले. नीरजा यांनी पोलिसांकडे आपली मूळ कागदपत्रे आणि संपर्क दिला. मुलाला स्वतः घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच मुलाचे पालक आल्यानंतर केव्हाही बोलावल्यास आपण यायला तयार असल्याचे सांगितले.

नीरजा यांनी ऋषीला घरी आणले. त्याला अंघोळ घालून खाऊ-पिऊ घातले. कपडे घालून तयार केले. काही वेळेनंतर पोलिसांचा नीरजा यांना फोन आला की, ‘मुलाचे पालक आले आहेत. तुम्ही मुलाला घेऊन या.’ नीरजा यांनी तात्काळ ऋषीला घेऊन थेरगाव पोलीस चौकी गाठली. तिथे ऋषीची आई ऋषीची वाट पाहत थांबली होती. आपल्या आईला बघताच ऋषीने तिच्याकडे धाव घेतली. आईकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून ऋषीला त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले.

ऋषीचे कुटुंब कोल्हापूर येथील आहे. कोल्हापुरात आलेल्या पुरात त्यांचे घर वाहून गेले. त्यानंतर ऋषीला घेऊन त्याची आई वाकड येथील आपल्या नातेवाईकांकडे काही दिवस राहण्यासाठी आली होती. तर त्याचे वडील कोल्हापुरातच आपला पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी थांबले होते. सोमवारी सकाळी ऋषीची आई घरी काम करत असताना ऋषी खेळत खेळत रस्त्यावर आला आणि दिसेल त्या वाटेने चालत गेला. बराच अंतर चालल्यानंतर तो परतीचा मार्ग विसरला. घाबरलेला ऋषी रडत रडत रस्त्याने जात असताना त्याला एका भंगार व्यावसायिकाने थांबवून ठेवले.

नीरजा माने म्हणाल्या, “आजूबाजूच्या नागरिकांचे ऐकून ऋषीला संशयित व्यक्तीच्या ताब्यात दिले असते तर ऋषीवर काय वेळ आली असती, याची कल्पना न केलेलीच बरी. शहरात अनेक ठिकाणी अशी लहान मुले सापडतात. पण कोणतीही चौकशी केल्याशिवाय मुलांना कुणाच्याही ताब्यात दिले जाते. यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांच्या मदतीने कागदपत्रांची ओळख पटवूनच मुलांना त्यांच्या पालकांकडे द्यायला हवे.”

थेरगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम म्हणाले, “नीरजा यांच्या तत्परतेमुळे लहान मुलाबाबत होणारी दुर्घटना टळली आहे. नीरजा यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर संशयित व्यक्तीने ऋषीचे अपहरण केले असते. नागरिकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे. विशेषतः सोसायटी, बाग आणि सार्वजनिक ठिकाणी खेळताना लक्ष द्यावे. संशयित व्यक्ती आढळल्यास त्याबाबत संबंधित पोलिसांना माहिती द्यावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.