Thergaon : माथाडी संघटनेच्या अध्यक्षाकडून एकावर वार

घर विकण्यास नकार दिल्याने केला हल्ला

एमपीसी न्यूज- घर खरेदी विक्रीच्या वादातून माथाडी संघटनेच्या अध्यक्षाने एकावर सत्तुरने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. थेरगाव येथील मंगलनगर परिसरात सोमवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

श्रीकांत महादेव सुर्वे (वय 35,रा. मंगलनगर , थेरगाव) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी वासंती सुर्वे (वय 33) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माथाडी अध्यक्ष बबलू जोगदंड (रा. मंगलनगर, थेरगाव) याच्यासह त्याची आई, बहीण आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बबलू हा भाजप संलग्न माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकाच परिसरात राहत असून आरोपी बबलू याला श्रीकांत यांचे राहते घर आणि लगतची जागा कमी किमतीत हवी होती. मात्र श्रीकांत याने व्यवहार करण्यास नकार दिल्याने दोघांत वाद झाले. या वादातून बबलू सोमवारी रात्री इतर आरोपींसह श्रीकांत यांच्या घरात आला. श्रीकांतवार सत्तूरने वार केले. यामध्ये श्रीकांत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीकांतच्या पत्नीने फिर्याद दिली असून वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.