Thergaon : हेवेदावे विसरून कामाला लागा; खासदार श्रीरंग बारणे यांचे थेरगावातील कार्यकर्त्यांना आवाहन

थेरगाव मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांची बैठक संपन्न

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसात नकळत कुणाकडून चुका झाल्या असतील. त्यावरून हेवेदावे, मतभेद झाले असतील, तर ते सर्व विसरून एकोपा जपा. आता प्रत्येकाने तत्परतेने कामाला लागले पाहिजे. लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य हातामध्ये देशाची सूत्रे देण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

थेरगावातील गावक-यांची खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठक घेतली. बैठकीत गावक-यांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक विजय बारणे, नंदू बारणे, संपत पवार, विमल जगताप, कांतीलाल गुजर, हभप सुदाम बारणे आदी उपस्थित होते. बैठकीत सर्व गावक-यांनी एकमताने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देण्याचा संकल्प केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “आपण सर्वांनी विश्वास दाखवून खासदार म्हणून निवडून देऊन देशसेवेची संधी दिली. आपला विश्वास सार्थ ठरवत देशाच्या संसदेत विशेष ठसा उमटवला. विविध विकासकामे आणि योजना दूरदृष्टीने राबवल्या. हे काम करत असताना आपण दाखवलेला विश्वास कायम स्मरणात आहे. शहरातून विरोधी पक्ष हद्दपार होत आहे. मावळ लोकसभा मतदार संघात एकंदर अशाच प्रकारची परिस्थिती आहे. आपण करत असलेल्या कामाचे हे फळ आहे. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून यापुढे देखील चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन खासदार बारणे यांनी उपस्थितांशी बोलताना केले. ‘माणसे जोडणे आणि कामातून त्यांना न्याय देणे’ हे सूत्र सर्वांनी पाळण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नंदू बारणे म्हणाले, “समाजाची जाण असणाराच चांगली समाजसेवा करू शकतो. याचा खासदार श्रीरंग बारणे यांनी चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आजवर स्वच्छ प्रतिमेचं राजकारण केलं आहे. येत्या काळात काही अफवांच्या वावड्या उडतील, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून देशहिताचा विचार करून खासदार बारणे यांना बहुमताने निवडून द्यावे.”

मावळ लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. शक्य तेवढ्या ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे पोहोचत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे काम पोहोचवून सर्वांचा विश्वास मिळवावा. असे आवाहन कांतीलाल गुजर यांनी केले.

सर्वांना समजून खासदार बारणे काम करतात. त्यांची काम करण्याची शैली उत्तम आहे. याही वेळी तेच खासदार होणार आहे, असे माजी नगरसेविका विमल जगताप म्हणल्या.

हभप सुदाम बारणे म्हणाले, “जो प्रश्न विचारू शकतो, तो प्रश्न सोडवूही शकतो. प्रश्न उपस्थित करून ते सोडविण्यासाठी हातोटीने प्रयत्न केल्यामुळे देशाच्या संसदेने देखील खासदार श्रीरंग बारणे यांचा सन्मान केला आहे. अशा व्यक्तीच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहायला हवे. हीच आपली जबाबदारी आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.