Thergaon Fire Update : फटाक्यांच्या कंपनीतील आग 21 तासांनी विझली

एमपीसी न्यूज – फटाक्याची दारू बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागली. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर असणाऱ्या पी.के. मेटल या कारखान्यात घडली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता लागलेली आग रविवारी दुपारी साडेबारा वाजता विझली. ही आग तब्बल 21 तास सुरू होती.

थेरगाव येथे पदमजी पेपर मिलच्या समोर दाट लोकवस्तीमध्ये पी के मेटल नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात फटाक्यांची दारू बनवली जाते. आकर्षक, रंगीबेरंगी, शोभेच्या दारुकामासाठी त्यात मॅग्नेशियमचा वापर केला जातो.

पी के मेटल्स या कारखान्यातील एका मशीनमध्ये शनिवारी दुपारी बिघाड झाला आणि त्यामुळे कारखान्यात आग लागली असल्याची माहिती कारखान्याच्या मालकाने अग्निशमन विभागाला दिली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. कारखान्यात असलेल्या मॅग्नेशियमने पेट घेतला आणि त्याचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे थेरगाव परिसरातील काही घरांच्या छताचे पत्रे, खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच, काही दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ही आग तब्बल 21 तासांनी विझली आहे.

यापूर्वी जुलै 2013 मध्ये देखील या ठिकाणी अशीच आग लागली होती. सुदैवाने त्यावेळी आणि आताही दोन्ही घटनांमध्ये जीवित हानी झाली नाही. फटाक्यांची दारू बनवण्याचा पी. के. मेटल हा कारखाना दाट लोकवस्तीत आहे. या ठिकाणी आग लागण्याचा कायम धोका असतो. त्यामुळे हा कारखाना बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.