Thergaon : खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये कामगारदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साईज्योती हॉस्पिटल थेरगावचे व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते अस्थिरोगतज्ञ डॉ. किशोर खंडेलवाल. वैज्ञानिक, संशोधक शास्त्रज्ञ क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे विश्वस्त अशोक नगरकर, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य अशोक पारखी, गतीराम भोईर, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे. लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, खिंवसरा पाटील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप, बालवाडी विभाग प्रमुख आशा हुले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. डॉ. किशोर खंडेलवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व संविधान म्हणण्यात आले. “पुण्य पवित्र भूमीचा आहे निखारा क्रांतीचा”हे गीत इयत्ता सहावीची विद्यार्थिनी संचिता काशिंदे हिने सुरेल आवाजात गायले. यानंतर शाळेच्या प्रगतीचा अहवाल कथन करत मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय करून दिला.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या 106 लोकांनी बलिदान दिले त्यांना आदरांजली देण्यासाठी शाळेतील वनिता जोरी या शिक्षिकेने “ए मेरे वतन के लोगो” या गीताचे गायन केले. प्रमुख पाहुणे किशोर खंडेलवाल यांनी मेहनत करा यश नक्कीच मिळेल. असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन आहार व आरोग्य या विषयी माहिती दिली. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, अंडी व अर्धा तास सूर्यप्रकाश या आवश्यक गोष्टी आहेत. तसेच रोज एक तास मैदानी खेळ खेळा. यामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राहील व तुम्हाला डॉक्टरांकडे रुग्ण म्हणून जाण्याची गरज नाही.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या कार्याविषयी माहिती सांगून महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा सर्व विद्यार्थी व पालकांना दिल्या. ‘शृंगार मराठीचा नववधूपरी अनुस्वाराचे कुंकु भाळावरी’ मराठी भाषेचे वर्णन करणारे हे गीत संचिता काशिंदे हिने सुरेल आवाजात गायले.

शास्त्रज्ञ अशोक नगरकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून अनेक संदेश दिले. ते म्हणाले, “छोटे व मोठे प्रयोग करत रहा पण ते प्रयोग समाजासाठी व देशासाठी उपयोगी पडतील असे करा. आयुष्यात आव्हाने घ्यायची तयारी असावी. सहजीवन जगताना एकमेकांच्या गुणांचा उपयोग करून यशस्वी व्हा. पालकांनीसुद्धा आपल्या मुलांना मार्गदर्शन करत रहा व मुलांनी सुद्धा पालकांच्या सूचनेचे पालन करा” असे बहुमूल्य संदेश त्यांनी दिले.

सूत्रसंचालन पुष्पा जाधव व आभार बालवाडी विभाग प्रमुख आशा हुले यांनी मानले. यानंतर द्वितीय सत्र परीक्षेचा प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.