Thergaon : चेक स्टॉप करण्यासाठी गेलेल्या महिलेचा बँक परिसरात विनयभंग

एमपीसी न्यूज – चेक स्टॉप करण्यासाठी मुलांसोबत गेलेल्या महिलेचा बँक परिसरात दोघांनी विनयभंग केला. तसेच महिलेच्या मुलांना मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

सुनील गणेशलाल ललवाणी आणि साईनाथ हिंगे (दोघेही रा. वाकड) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि सुनील हे एकत्रित काम करायचे. कालांतराने महिलेला सुनील याच्या सोबतचे काम थांबवायचे होते. एकत्रित काम करत असताना सुनील याला दिलेले चेक स्टॉप करण्यासाठी महिला मंगळवारी सकाळी त्यांच्या मुलांसह बँकेत गेल्या. चेक स्टॉप करण्यासाठी बँक व्यवस्थापकांकडे अर्ज केला.

बँक व्यवस्थापकाने याबाबत सुनील याला फोन करून सांगितले. त्यानंतर तात्काळ सुनील आणि साईनाथ त्यांच्या इतर दोन साथीदारांसोबत बँकेत आले. ‘तू माझे चेक स्टॉप करायला आला आहेस काय? असे म्हणत सुनील याने महिलेच्या मुलाला मारहाण केली.

  • मुलाला बँकेच्या बाहेर ओढत नेले. सर्व आरोपींनी मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सुनील आणि साईनाथ यांनी महिलेशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.