Thergaon : ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे – डॉ. नेमिनाथ शास्त्री

एमपीसी न्यूज – शास्त्रविद्या आणि कलांचे प्रणेता प्रथम तीर्थंकर ऋषभदेवापासून आज अखेर हजारों वर्षाचा इतिहास अतिशय समृध्द आणि विशाल आहे. अनेक प्राचीन मंदिरे, मूर्तिकला, शिल्पकला, हस्तकला, ताम्रपट, शिलालेख, तडपत्रीय ग्रंथ आदी एतिहासित वास्तूंचे जतन, संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. त्यांचे ऐतिहासिक महत्व जाणले पाहिजे, त्यावर संशोधन केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉ. नेमिनाथ शास्त्री यांनी थेरगाव येथे केले.

महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे अकरावे दोन दिवसीय अधिवेश पिंपरी -चिंचवड शहरातील थेरगाव येथे आयोजित केले आहे. सकल जैन समाज पिंपरी-चिंचवडतर्फे आयोजित या परिषदेचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलुगुर डॉ. नितीन करमळकर आणि डॉ. नेमिनाथ शास्त्री यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

  • यावेळी स्वागताध्यक्षा आरएमडी फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, संस्थापक श्रेणीक अन्नदाते, अधिवेशन अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी, अतुल शहा, अजित डुंगरवाल, नितीन चोपडा, प्रकाश कटारिया, मनोज सोळंखी, दिलीप घेवारे आदी उपस्थित होते.

यावेळी नेमिनाथ शास्त्री पुढे म्हणाले, केवळ वास्तुंचे संवर्धन व जतन करणे म्हणजे इतिहास नव्हे, तर सांस्कृतिक, आध्यात्मिक विचारांचे संरक्षण व संवर्धन म्हणजे ख-या अर्थाने इतिहासाचे जतन करणे होय. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र आपल्या विचाराने देश किंवा समाजाची हानी होणार नाही, याचा विवेक बाळगणे आवश्यक आहे.

  • डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, देशाच्या जडणघडणीत जैन धर्मांचे मोठे योगदान आहे. दातृत्व हा जैनांचा प्रमुख गुण आहे. जागतिक शांततेसाठी जैन धर्माच्या आचार आणि विचारांची गरज आहे. जैन इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. धर्म हे ब्रीद महत्वाचे आहे. जगातील हिंसाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहिंसेचा मार्ग समाजात रुजवणे महत्वाचे आहे. इतिहासात दडलेले साहित्य जगासमोर आणणे ही काळाची गरज आहे.

या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. जवाहर मुथा यांना साहित्य अलंकारसह पुरस्काराने सन्मानित केले. निर्मला माणगावे, रेखा बेंजल, सरिता शहा, सुवालाल शिंगवी, प्रा. सुरेखा कटारिया, तनिषा चोपडा, विजय लुंगाडे, अंजली शहा, हर्षल डोणगावकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • दरम्यान, स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कटारिया यांनी केले. डॉ. श्वेता राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.