Thergaon News : बिर्ला हॉस्पिटलवर कारवाई करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना साकडे

माहिती अधिकार कार्यकर्त्याने वाचला बिर्ला हॉस्पिटलाकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा

एमपीसीन्यूज : डोळ्यांच्या उपचारासाठी आलेल्या देहूरोड येथील 60 वर्षीय महिलेला तिच्या नातेवाईकांच्या परवानगी शिवाय कोविड वॉर्डात दाखल करून 12 तासात 37  हजार रुपयांचे बिल मागणाऱ्या थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी तसेच या रुग्णालयावर महापालिका किंवा राज्य शासनाचे नियंत्रण आणण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात रमेशन यांनी रुग्णाच्या नातेवाइकांसह गुरुवारी ( दि. 24 ) खासदार बारणे यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली. या वेळी देहूरोड येथील 60  वर्षीय वृद्ध महिलेला बिर्ला रुग्णालयाकडून झालेल्या मनस्तापाची हकीकत रमेशन यांनी खासदार बारणे यांच्यासमोर कथन केली. यावेळी सागर लांगे आणि उमेश भंडारी उपस्थित होते.

देहूरोड येथील   वृद्ध महिला डोळ्यांच्या तपासणीसाठी बिर्ला रुग्णालयात गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला दिला. त्यापूर्वी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, त्यानंतर काहीवेळातच संबंधित महिलेच्या नातेवाईकांना न विचारताच त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून त्यांना थेट कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

हा सर्व प्रकार एका दिवसात घडला. नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ डिस्चार्ज देण्याची मागणी केली असता त्यांना 37 हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगितले.

नातेवाईकांनी संबंधित महिलेची अन्य ठिकाणी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने बिर्ला रुग्णालय रुग्णाची लुबाडणूक करण्यासाठी कोविड वॉर्डात रुग्णांना दाखल करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे रमेशन यांनी खासदार बारणे यांच्या निर्दशनास आणून दिले.

त्याचबरोबर बिर्ला रुग्णालय व्यव्सस्थापनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना केली जाणारी दमबाजी, वाढीव बिल आकारणी, अशा अनेक वाढत्या तक्रारी पाहता या रुग्णालयाचे व्यवस्थापन पिंपरी चिंचवड महापालिका अथवा राज्य शासनाच्या नियंत्रणात आणावे, अशी मागणीही रमेशन यांनी केली आहे.

त्यावर याबाबत लवकरच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिर्ला रुग्णालयाविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारी सादर करणार आहे. तसेच या रूग्णालयावर शासनाचे नियंत्रण आणण्याची मागणी करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितल्याची माहिती रमेशन  यांनी दिली.

दरम्यान, बिर्ला हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी पिळवणूक राखण्यासाठी तसेच या रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर महापालिका किंवा राज्य शासनाचे नियंत्रण आणण्यासाठी रमेशन यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांसह राज्याच्या आरोग्य विभाग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.