Thergaon News : डांगे चौकातील ब्लाइंड स्पॉट देतोय अपघातांना निमंत्रण

एमपीसी न्यूज – डांगे चौकात सुरु असलेले भुयारी मार्गाचे काम, त्यासाठी वाळवलेली वाहतूक, तिथेच पार्क केलेले टेम्पो आणि अन्य वाहने, उड्डाणपुलाचे खांब यामुळे डांगे चौकात ब्लाइंड स्पॉट तयार झाला आहे. हा ब्लाइंड स्पॉट अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. बीआरटी मार्गावरून येणारी आणि वाकडकडून थेरगावकडे येणारी वाहने एकमेकांना दिसत नसल्याने डांगे चौकात प्राणांतिक अपघात घडत आहेत. नुकताच एक अपघात झाला असून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

डांगे चौकात भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतूक वळवली असल्याने रस्ते निमुळते झाले आहेत. थेरगाव, वाकड, रावेत परिसरातून पुण्याकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. तसेच आयटी हब असलेल्या हिंजवडीकडे जाण्यासाठी देखील डांगे चौकातून अनेक वाहने जातात. त्यामुळे डांगे चौकातील वाहतूक कायम मोठ्या प्रमाणात असते.

काळेवाडीकडून डांगे चौकाकडे येणा-या मार्गावर बीआरटी मार्ग आहे. बीआरटीसाठी स्वतंत्र मार्ग असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसेस वेगात जातात. तर वाकडकडून थेरगावकडे येणाऱ्या मार्गावरील वाहनांना काळेवाडीकडून येणारी वाहने दिसत नाहीत. दोन्ही मार्गावरील वाहन चालकांना वाहने न दिसण्यामागे आणखी एक कारण म्हणजे डांगे चौकात उड्डाण पुलाखाली पार्क केले जाणारे टेम्पो आणि इतर वाहने. या संपूर्ण प्रकारामुळे चौकात ब्लाइंड स्पॉट तयार झाला आहे. हा ब्लाइंड स्पॉटच अपघातांना निमंत्रण देत आहे.

या चौकात वारंवार अपघात होत आहेत. शुक्रवारी एक अपघात झाला असून यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. वाकडच्या बाजूने थेरगावकडे सुरक्षारक्षक दुचाकीवरून येत असताना डांगे चौकात बीआरटी मार्गातून आलेल्या पीएमपीएमएल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. यापूर्वी देखील रस्ता ओलांडणाऱ्या एका 17 वर्षीय मुलाला टेम्पोने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार मुलाचा जागीच मृत्यू झाला. किरकोळ अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिल घोडेकर म्हणाले, “डांगे चौकात अपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. थेरगाव सोशल फाउंडेशनकडे नागरिकांनी याबाबत माहिती दिली आहे. थेरगाव सोशल फाउंडेशनचे सदस्य डांगे चौकातील वाहतूक, सुरु असलेले भुयारी मार्गाचे काम, भाजी मंडई, अतिक्रमण, वाहनांचे पार्किंग याचा आढावा घेणार आहे. त्यानंतर संबंधित प्रशासनाला याबाबत कळवले जाणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. वाकड कडून डांगे चौकात येणाऱ्या मार्गावर स्पीड ब्रेकर लावणे ही प्राथमिक गरज आहे.”

हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे म्हणाले, “डांगे चौकात दोन्ही बाजूने काम सुरु आहे. त्यामुळे रस्ता निमुळता झाला आहे. आतापर्यंत या चौकात दोन कर्मचारी आणि वॉर्डन यांच्या माध्यमातून वाहतूक नियमन केले जात होते. आता एक अधिकारी, चार कर्मचारी आणि वॉर्डन यांच्या माध्यमातून डांगे चौकातील वाहतूक सुरळीत केली जाईल. रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यासाठी महापालिका प्रशासनासोबत मिळून उपाययोजना केल्या जातील. चौकात होणारे अपघात न होण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.